Dam Water Storage Pudhari
ठाणे

Dam Water Storage: बारवी धरण ५३ टक्के तर तानसा ८० टक्के भरले; सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

भातसा ५९ टक्के, मोडकसागर ७७ टक्के

पुढारी वृत्तसेवा

बजरंग वाळुंज

डोंबिवली: ठाण्‍यासह मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख चार धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. तानसा ८० टक्के भरले असून त्या खालोखाल मोडकसागर ७८ टक्के भरले आहे.

तर भातसा ५९ टक्के भरले आहे. सर्वात मोठे बारवी धरण ५३ टक्के भरले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असला तरी तो समाधानकारक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार जुलै २० ते ३० या काळात पाऊस वाढणार आहे. त्यामुळे जुलै अखेरीपर्यंत ठाण्‍यातील धरणांमध्‍ये चांगला पाणीसाठा होईल, अशी स्थिती आहे. ठाण्‍यातील अन्य दोन धरणे १०० टक्के भरली आहेत.

यामध्‍ये चिखलोली, पिंजाळ धरणे १०० टक्के भरली आहेत. मध्‍य वैतरणाही ४६ टक्के भरले आहे. सध्‍या पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबई, ठाणे, पालघर यासाठी एकूण सात धरणांमधून पाणी येते. यामध्‍ये सूर्या, मध्‍य वैतरणा ही धरणे पालघर जिल्ह्यात आहेत. तर उर्वरित तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, बारवी, मोडक सागर ही धरणे ठाणे जिल्ह्यात आहेत.

जुलै अखेरीपर्यंत पूर्ण क्षमतेने पाऊस झाल्यास ही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील, असे सांगितले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह कल्याण-डोंबिवली परिसरातील लाखो रहिवाश्यांच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या बारवी धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीपर्यंत पोहोचलेला नाही.

शनिवारपर्यंत धरण ५३.२४ टक्के भरले असून, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत पाणीपातळी आणि साठ्यात लक्षणीय घट दिसून येत आहे.पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, बारवी धरणाची सध्याची पाणीपातळी ६५.७२ मीटर इतकी आहे. धरणाची कमाल ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे.

त्यामुळे धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी अजून ६.८ मीटरची तूट आहे. सध्या धरणात १८०.४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बारवी धरणातून नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र प्रशासनाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

पुढील पाऊस महत्त्वाचा

हवामान विभागाने पुढील ४८ तास कल्याण, शहापूर आणि बारवीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन ओव्हरफ्लोची शक्यता वाढेल. जलतज्ज्ञांच्या मते, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात बारवी धरण ५० टक्क्यांच्या आसपास असणे ही चिंतेची बाब नाही.

मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात मोठी घट आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण असमान आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत सलग चांगला पाऊस झाला नाही तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आता पडणारा प्रत्येक पाऊस महत्त्वाचा आहे.

प्रशासनाचे पुढील नियोजन

सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला बारवीतून नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र पाणीसाठा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या पार्श्वभूमीवर आढावा बैठका होत असतात.

धरणाची पाणीपातळी ६० टक्क्यांपर्यंत न गेल्यास शेतीसाठी पाणी कपात आणि बिगर पिण्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचा विचार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि गळती दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाच्या अपडेटनुसार दर आठवड्याला साठ्याचा आढावा घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT