

पालघर: पालघर तालुक्यातील कुडे गावातील मोरीपाडा येथे अनधिकृतपणे साठवून ठेवलेल्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या साठ्यावर मनोर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत विविध कंपन्यांचे एकूण 40 भरलेले तर रिकामे 81 सिलिंडर मिळून 121 गॅस सिलिंडर,गॅस ट्रान्सफर करण्याचे साहित्य व इतर उपकरणांसह सुमारे चार लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, स्फ़ोटक अधिनियम,अत्यावश्यक वस्तू अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनोर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
दरम्यान पोलिसांच्या धडक कारवाईमुळे एलपीजी गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दनाणले आहे.
अहमदाबाद महामार्गा लगतच्या कुडे गावातील मोरीपाडा येथे अनधिकृतपणे व्यवसायीक गॅस सिलिंडरचा साठा करून, सिलिंडरची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे मनोर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मोरी पाडा येथील चेतन सातवी याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी चेतन सातवी याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये व्यावसायिक वापराचे एलपीजी गॅस सिलिंडर आढळून आले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये गो-गॅस कंपनीचे 39 व्यावसायिक सिलिंडर, भारतगॅस कंपनीचे 61 व्यावसायिक सिलिंडर, तसेच इतर कंपन्यांचे गॅस सिलिंडर, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य यांचा समावेश आहे.
जप्त केलेल्या साहित्यामध्ये गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रिक मोटर पंप, इलेक्ट्रिक डिजिटल वजन काटा, इलेक्ट्रिक बोर्ड तसेच इतर साहित्याचा समावेश असून त्याची एकूण किंमत चार लाख 58 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, स्फोटक पदार्थ अधिनियम व तरल पेट्रोलियम गॅस आदेशातील कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.