Vitthalwadi Depot Thane Pudhari
ठाणे

MSRTC NCMC Card | एसटी प्रवाशांसाठी खुशखबर: विठ्ठलवाडी आगारात एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू 'ही' कागदपत्रे आवश्यक

कार्ड रूपे ऑन-द-गो या तंत्रज्ञानावर आधारित असून याद्वारे प्रवाशांना तिकीट काढणे अधिक सोपे होणार

पुढारी वृत्तसेवा

ST Bus Smart Card Registration

डोंबिवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागांतर्गत असलेल्या विठ्ठलवाडी आगारात आता प्रवाशांसाठी एनसीएमसी अर्थात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड नोंदणी प्रक्रिया जोमाने सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना आता रोख रकमेच्या कटकटीतून मुक्त होऊन वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

हे कार्ड रूपे ऑन-द-गो या तंत्रज्ञानावर आधारित असून याद्वारे प्रवाशांना तिकीट काढणे अधिक सोपे होणार आहे. विशेष म्हणजे ज्या प्रवाशांना सवलतीचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास प्रवाशांना पूर्ण भाडे द्यावे लागेल. सर्व सवलतीच्या तिकिटांचे वितरण केवळ कार्डच्या वॉलेट मधूनच केले जाईल. प्रवासी कार्डमध्ये रोख रक्कम किंवा युपीआयद्वारे पैसे भरू शकतात. नोंदणी केल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित ठिकाणी कार्ड उपलब्ध होईल. नवीन स्मार्ट कार्ड केवळ १९९ रूपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. हे कार्ड रोख रकमेसारखेच असून ते अहस्तांतरणीय आहे.

विठ्ठलवाडी आगाराने स्पष्ट केले आहे की, कार्ड जारी करण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य आहे. कार्डवर आधारकार्डनुसारच नाव आणि फोटो छापला जाईल. सवलत घेणाऱ्या प्रवाशांनी आरक्षणावेळी कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे. ज्यांना हे कार्ड हवे आहे त्यांनी स्वतःचे आधारकार्ड आणि त्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक घेऊन विठ्ठलवाडी आगारात उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

महिला, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिक : आधार कार्ड

दृष्टीहीन व दिव्यांग : वैश्विक ओळखपत्र

विद्यार्थी : सरल क्रमांक

​इतर सवलती : संबंधित शासकीय प्रमाणपत्र

सवलत नसलेले सामान्य प्रवासी : मोबाईल ओटीपीद्वारे नोंदणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT