ठाणे : मुख्खा मेट्रोला जोडणाऱ्या ठाण्याच्या अंतर्गत वर्तुळकार मेट्रोला केंद्राकडून निधी मंजूर झाला आहे. केंद्राच्या कॅबिनेटच्या बैठकीत शुक्रवारी (दि.१६) १२ हजार २०० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता वडाळा ते कसरवडवली या मुख्य मेट्रो प्रकल्पसह ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला देखील खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.
वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबईसोबतच ठाणेकरांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाण्यासाठी वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली होती. तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त डॉ संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली होती. महामेट्रो कंपनीकडून या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. मात्र वर्तुळाकार मेट्रो हा अधिक खर्चिक असल्याचे सांगत केंद्राने अंतर्गत मेट्रो ऐवजी एलआरटी प्रकल्प राबवण्याच्या सूचना ठाणे महापालिकेला केल्या होत्या.
वर्तुळाकार मेट्रो हा प्रकल्प १३ हजार कोटींचा होता तर एलआरटी प्रकल्पाची किंमत ही ७ हजार १६५ कोटींच्या घरात होती. त्यामुळे एलआरटीमुळे सुमारे ५ हजार कोटींची बचत होणार होती. तसा प्रस्तावही पालिकेने मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता एलआरटी प्रकल्प व्यवहार्य नसल्यचे मत केंद्राने नोंदवल्याने केंद्राच्या सूचनेनंतर पुन्हा वर्तुळाकार मेट्रोचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता
एकूण २९ किमी लांबीचा हा मार्ग असून ३ किमी पर्यंतचा मार्ग हा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर १३ रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत . नवीन विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक येथून या वर्तुळाकार मेट्रोची सुरुवात होणार आहे . वागळे इस्टेट, लोकमान्य, शिवाईनगर, गांधीनगर, मानपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत, बाळकूम, राबोडी आणि ठाणे स्टेशन असा मेट्रोचा मार्ग होता. त्यावेळी दोन स्थानके भुयारी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र वर्तुळाकार मेट्रोचे काम आता महामेट्रोच्या ऐवजी एमएमआरडी करणार आहे.
ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी, असे मुख्यमंत्र्यांचे नियोजन आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे या प्रकल्पालाही गती मिळेल, अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसेच शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ आहे. त्यामुळे २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोच्या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार आहे. मेट्रो कोचची संख्या वाढवण्यासंदर्भातही विचार सुरु आहे. सद्यस्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीने मेट्रो कोच वाढविणे आवश्यक आहे. केंद्राच्या आर्थिक सहकार्यामुळे हा प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे.
एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.