मिरा-भाईंदर शहरातील प्रवाशांचा प्रवास सुसह्य होण्यासाठी राज्य शासनाने दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प टप्पा क्रमांक 9 च्या कामाला 9 सप्टेंबर 2019 मध्ये सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मेट्रोचे काम लवकर पूर्ण करून त्याची सेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी माजी नगरसेवक अजित पाटील यांनी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे गेल्या महिन्यात लेखी पत्राद्वारे केली होती. त्यावर एमएमआरडीएने पाटील यांना पाठविलेल्या पत्रात हि मेट्रो दोन टप्प्यांमध्ये सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यातील पहिला टप्पा डिसेंबर 2024 मध्ये दहिसर ते काशिमीरा दरम्यान सुरु करण्यात येणार असून दुसर्या टप्प्यात काशिमीरा ते भाईंदर दरम्यानची मेट्रो सुरु करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील यांनी अजित पाटील यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. यामुळे येत्या तीन महिन्यानंतर पश्चिम महामार्गावरील गुंदवली अथवा अंधेरी ते मिरा-भाईंदरमधील काशिमीरा दरम्यानच्या प्रवाशांचा प्रवास जलद व सुसह्य होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या दहिसर पर्यंतची मेट्रो पश्चिम महामार्गावरील टोल नाक्यापासून सुमारे 500 मीटर अंतरावरून अंधेरी पूर्व, पश्चिमेला जाते. येथून प्रवास करण्यासाठी शहरातील प्रवाशांना दोनदा गाड्या बदलाव्या लागत असल्याने त्यांना या मेट्रोचा कोणताही फायदा होत नाही. तर दुसर्या टप्प्यातील सुसह्य प्रवासासाठी मिरा-भाईंदरमधील प्रवाशांना पुढील वर्षपूर्तीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मिरा-भाईंदर शहर मुंबई शहराला जोडण्यासह येथील प्रवाशांचा प्रवास सुसह्य व्हावा, यासाठी राज्य शासनाने दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प क्रमांक 9 चे काम सुरु करण्यास 9 सप्टेंबर 2019 रोजी मान्यता दिली.
हा प्रकल्प पुढील 6 वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएकडून त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. या प्रकल्पाची सद्यस्थिती पाहता या वर्षी हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने मिरा-भाईंदर मधील प्रवाशांचा मुंबईकडील प्रवास दिवसेंदिवस खडतर होऊ लागला आहे. त्यांना मुंबईकडील प्रवासासाठी लोकल रेल्वेसह रस्ते वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे. हे दोन्ही पर्याय प्रवाशांना असह्य होत असून रस्ते वाहतुकीत वाहतूक कोंडीचा अडसर हा मोठा विलंबाचा तसेच वेळ खाऊपणाचा ठरत आहे. तर लोकल रेल्वेद्वारे सकाळ व संध्याकाळच्या वेळी अनुक्रमे मुंबई व मिरा-भाईंदरकडे प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते.
सकाळच्यावेळी अगोदरच वसई, विरारहून भरून येणार्या लोकलमध्ये मिरा-भाईंदरमधील प्रवाशांना चढणे म्हणजे गड जिंकण्यासारखे ठरते. त्यातच लोकलमधील प्रचंड गर्दीतून आतमध्ये वाट काढताना कपड्यांसह कार्यालयीन सामानांची वाट लागते.
मिरा-भाईंदर शहरातून दररोज सुमारे 1 लाखाहून अधिक प्रवासी लोकलने मुंबईसह उपनगरांमध्ये प्रवास करीत असतात. या प्रवाशांना रोजचा प्रवास लोकल प्रवास प्रचंड गर्दीतूनच करावा लागतो. अनेकदा त्यांचा गर्दीतून मार्ग काढताना लोकलमधून पडून दुर्दैवी अंत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक प्रवाशांच्या प्रवासाला पर्याय म्हणून राज्य शासनाने 2019 मध्ये सुरु केलेला दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प यंदा पूर्ण होणे अपेक्षित असला तरी मेट्रोच्या कामाची सद्यस्थिती पाहता तो या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रो रेल्वे सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असल्याने मिरा-भाईंदरमधील प्रवाशांचा मात्र हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मेट्रो सुरु होण्याच्या प्रतिक्षेत येथील प्रवाशांचा प्रवास लोकलच्या गर्दीतूनच होत असून त्यांना हि मेट्रो लवकरात लवकर सुरु करून शासनाने दिलासा देणे अपेक्षित आहे. त्यासाठी या वर्ष अखेरपर्यंत दहिसर ते भाईंदर मेट्रो सुरु करावी, अशी मागणी पाटील यांनी एमएमआरडीए आयुक्तांकडे केली होती. त्यावर एमएमआरडीएने पाटील यांना पाठविलेल्या पत्रात हि मेट्रो दोन टप्प्यांमध्ये सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.