MMRC Metro Project
भाईंदर : दहिसर ते भाईंदर मेट्रो रेल्वे टप्पा क्रमांक ९ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशिगाव दरम्यानचा मेट्रो मार्ग डिसेंबर २०२४ मध्ये सुरु होण्याची शक्यता असतानाच दुसऱ्या टप्प्यातील काशिगाव ते भाईंदर दरम्यानचा मेट्रो मार्ग सुरु होण्यास डिसेंबर २०२६ उजाडणार आहे. हा मार्ग पूर्ण होण्यास विविध तांत्रिक अडचणी उद्भवल्या असतानाच भाईंदर पूर्व, पश्चिम रेल्वे मार्गादरम्यान गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकची प्रतिक्षा एमएमआरडीएला लागून राहिल्याचे समोर आले आहे.
दहिसर ते भाईंदर दरम्यानचा मेट्रो प्रकल्प टप्पा क्रमांक ९ ला सप्टेंबर २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. हि मेट्रो पूर्णपणे सुरु होण्याचा अवधी २०२४ पर्यंत देण्यात आला होता. मात्र त्यातील विविध तांत्रिक अडचणींमुळे ती सुरु होण्यास विलंब लागला. तत्पूर्वी हि मेट्रो दोन टप्प्यांमध्ये सुरु करण्याचे नियोजन एमएमआरडीएकडून करण्यात आले होते. दहिसर ते काशिगाव दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४ तर काशिगाव ते भाईंदर (पश्चिम) दरम्यानचा दुसरा टप्पा डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे जाहीर करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यातील काशिगाव मेट्रो स्थानकाच्या एक्झिट १ च्या कामात मेसर्स सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन प्रा. ली. या कंपनीच्या जागेचा अडसर निर्माण झाला होता. हि कंपनी आ. नरेंद्र मेहता यांच्या मालकीची असल्याने त्यांनी पालिकेकडे त्याचा मोबदला देण्याची मागणी केली होती.
हा मोबदला देण्यासाठी पालिकेला लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा लागला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मेहता यांनी ती जागा तात्काळ मेट्रो प्रकल्पाला दिल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या मेट्रो मार्गाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली असली तरी ती पूर्ण क्षमतेने सुरु होण्यासाठी डिसेंबर २०२५ उजाडणार आहे. यामुळे वाहतुकीला गती मिळणार असल्याचे बोलले जात असले तरी त्याचा फायदा या भागातील सुमारे ५० हजार प्रवाशांना होणार असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गाला पूर्ण क्षमतेने सुरु होण्यास डिसेंबर २०२६ उजाडणार असल्याचे समोर आले आहे.
या मार्गावरील दहिसर चेकनाका ते दारा ढाबा दरम्यानच्या उड्डाणपुलाला भाईंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम अद्याप प्रलंबित असून त्यावरून मेट्रो मार्ग तयार करण्यात येत आहे. तसेच शिवार गार्डन ते भाईंदर फाटक दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्याच्या कामाला देखील सुरुवात झाली असून येत्या १५ ऑगस्ट रोजी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या सुत्राकडून सांगण्यात आले.
याचप्रमाणे हा मेट्रो मार्ग भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडला जाणार असल्याने त्याला पश्चिम रेल्वेच्या लोहमार्गावर गर्डर टाकून क्रॉसिंग करावी लागणार आहे. त्यासाठी रेल्वेचा ब्लॉक अत्यावश्यक ठरणार असून त्याबाबत पश्चिम रेल्वेकडून अद्याप एमएमआरडीएला कळविण्यात आलेले नाही. त्याची प्रतिक्षा एमएमआरडीएला लागून राहिली असली तरी मेट्रो प्रकल्प ९ व ७ साठी उत्तन येथे कारशेड नियोजित करण्यात आली आहे. त्याच्या कामाला अद्यापही सुरुवात न झाल्याने मेट्रो प्रकल्प ९ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोला मोठा विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे भाईंदरकरांचे मेट्रोचे स्वप्न तूर्तास लांबणीवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.