डोंबिवली : डोंबिवलीतील पूर्वेकडील पाथर्ली रोडला असलेल्या पोटेश्वर मंदिरासमोरच्या मंडप गोडाऊनला सोमवारी (दि.४) रात्री सुमारास अचानक आग लागली. या आगीत मंडप गोडाऊन भस्मसात झाला. ही आग शार्ट सर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
या आगीची झळ जवळील इमारतीला बसली होती. तथापी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. शेजारीच रहिवासी इमारत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. या गोडाऊनमध्ये मंडपासाठी लागणारे कापड, काथ्याच्या दोऱ्या, लाकडे, बांबू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक कयास आहे. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.