

जोगेश्वरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील अंधेरी परिसरातील रिया पॅलेस इमारतीला आज बुधवारी (दि. १६) सकाळी लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.
आज (दि.१६ ऑक्टोबर) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिम येथील लोकंडवाला संकुलातील रिया पॅलेस इमारतीला पहाटे आग लागण्याची घटना घडली. ही इमारत १४ मजली असून त्यातील १०व्या मजल्यावर आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण शोधले जात आहे. दरम्यान, १० मजल्यावरील फ्लॅटच्या एअर कंडिशनिंग युनिटमधून ही आग पसरल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
चंद्रप्रकाश सोनी (वय ७४), कांता सोनी (७४) आणि त्यांच्या घरातील मदतनीस पेलुबेटा (४२) अशी तीन मृतांची नावे आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांची आरएनए शॉपिंग कॉम्प्लेक्स लोखंडवालामध्ये अव्हलॉन नावाची शिपिंग कंपनी आहे. आगीच्या घटनेनंतर सोनी यांच्यासोबत १५-२० वर्षांपासून काम करत असलेले त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
इमारतीतील दहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली. आग दहाव्या मजल्यावरुन १४ व्या मजल्यांपर्यंत पसरली होती. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी आठच्या सुमारास ही आग लागली, ही आग लेव्हल १ ची होती. सध्या आग विझवण्यात आली असून अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. या घटनेत फ्लॅटमधील तीन जणांचा आगीत भाजल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघांना गंभीर अवस्थेत कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रुग्णालयात तिघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.