ठाण्यात स्वागतयात्रांचा जल्लोष... pudhari photo
ठाणे

Thane New Year Swagat Yatra : ठाण्यात स्वागतयात्रांचा जल्लोष...

13 स्वागतयात्रांनी शहर दुमदुमून गेले

पुढारी वृत्तसेवा

ठाणे ः लेझीमचा नाद... ढोल-ताशांचा दणदणाट, भगवे झेंडे, चित्ररथ, पारंपरिक वेशातील स्त्री - पुरुष अशा अमाप उत्साहात गुरुवारी ठाणेकरांनी मराठी नववर्ष स्वागतयात्रांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत केले. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या ठाणे शहरातून निघालेल्या मुख्ययात्रांसह, वर्तकनगर, कोपरी, समता नगर, कळवा, लोकमान्यनगर सह 13 स्वागतयात्रांनी शहर दुमदुमून गेले होते.

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या नववर्ष स्वागतयात्रेस कौपिनेश्वर मंदिरापासून प्रारंभ झाला. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शेिंदे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे यांनी श्री कौपिनेश्वराची पूजा केली. स्वागत यात्रेच्या अध्यक्षा धनश्री लेले, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष संजीव ब्रम्हे, अश्विनी बापट, निमंत्रक निखिल सुळे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मंदिरापासून ते जांभळी नाक्यापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीला खांदा दिला. यंदाच्या यात्रेत ठाण्यातील विविध सामाजिक संस्थांचे चित्ररथ सहभागी झाले होते. यात्रेच्या मार्गावर सुरेख रांगोळ्या रेखाटल्या. स्वागत यात्रेच्या मार्गावर तीन पेट्रोल पंपावर क्रीडा भारतीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्‌‍ या राष्ट्रीय गीतावर सादर केलेल्या प्रात्यक्षिकाला ठाणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यात्रेच्या प्रारंभी सरस्वती विद्या मंदिराच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. ठाण्यातील प्राचीन घंटाळी देवीची पालखीही यात्रेत सहभागी झाली होती.

यात्रेतील चित्ररथावर शंकराची भव्य मूर्ती यात्रेचे आकर्षण होती. मराठा मंडळाने फलकाद्वारे युद्धाच्या दुष्परिणामांचा संदेश दिला. वारकरी प्रतिष्ठानची साईबाबांची पालखी होती. वारकरी साईबाबांचा जयघोष करत यात्रेत सहभागी झाले होते. ब्रम्हकुमाारी संस्थेच्या वतीने स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे आणि व्यसनमुक्त ठाणे असा संदेश दिला. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणसह अनेक सामाजिक संदेश दिले.

साधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ताशाच्या जोरावर ठेका धरला होता. भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठीच्या उपाययोजनाचा संदेश दिला. वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही ठाकर... ठाकर या गीताच्या तालावर नृत्य सादर केले. कौपिनेश्वर मातृशक्ती विभागाच्या महिला पारंपरिक पोषाखात बाईक रॅलीत सहभागी झाल्या होत्या. समर्थ भारत संस्थेने समर्थ भारत ः समर्थ ठाणेचा नारा या यात्रेत दिला.

कर्नाटक सांस्कृतिक संघाने लोककलेवर नृत्य सादर करत यात्रेत गेल्या वर्षीप्रमाणेच उत्साहात सहभाग नोंदवला. जीवन विद्या मिशन, जीवन विद्या मिशन ध्यानसाधना केंद्राच्या वतीने विविध सामाजिक संदेश देण्यात आले. ठाणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यांपासून घ्यावयाची दक्षता याबाबत फलकाद्वारे जागृती केली. याशिवाय यात्रेत कै. वामनराव ओक रक्तपेढी, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, गौतम विद्यालय, अहाण फाऊंडेशन, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, राज्याभिषेक समारोह संस्था, मैत्रीबोध परिवार, अखिल विश्व गायत्री परिवावर, गौड सारस्वत ब्राम्हण मंडळ, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड, पर्यावरण दक्षता मंडळ, मनशक्ती केंद्र व ठाणे महापालिकेच्या आरोग्य, शिक्षण, घनकचरा विभागाचे चित्ररथ सहभागी झाले होते.

नौपाड्यात स्वागतयात्रा येताच दरवर्षीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून या स्वागतयात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच आयुक्त सौरभ राव व शिवसेनेचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्रेत तृतीय पंथीय यंदा प्रथमच सहभागी झाले होते. आम्हाला समाजात तुमच्याप्रमाणेच माणूस म्हणून जगू द्या, असे आवाहन या बांधवांनी केले.

महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संकल्प

“महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करून त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेणे, हा आमचा संकल्प आहे. सामान्य माणसाच्या स्वप्नांना बळ देत त्याच्या आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि आत्मविश्वासाची नवी पहाट उगवावी, यासाठी शासन सातत्याने कार्यरत राहील,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाण्यातील गुढीपाडव्याची ही शोभायात्रा केवळ परंपरेचा भाग नसून स्वर्गीय आनंद दिघे यांनी दिलेल्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारा आणि अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेणारा उत्सव ठरत असल्याकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष वेधले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याने ठाणे शहरात उत्साह, अभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची नवी ऊर्जा निर्माण केली. नववर्षाच्या या मंगलदिनी ठाणे शहराने केवळ सण साजरा केला नाही, तर परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर सेतू उभारला.

सांस्कृतिक वैभव जपत समाजप्रबोधनाचा संदेश देणारी ही शोभायात्रा ठाणेकरांच्या एकजुटीची आणि सकारात्मकतेची जिवंत साक्ष ठरली. प्रत्येकाच्या मनात नव्या आशा, नव्या संकल्पांची पालवी फुटावी आणि येणारे वर्ष सर्वांसाठी यश, समाधान आणि समृद्धी घेऊन यावे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या या सांस्कृतिक सोहळ्याने ठाणे शहराला नवचैतन्याची प्रेरणा देत नववर्षाचे स्वागत अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय केले.

आनंद आश्रमात साजरा झाला गुढीपाडवा

आनंदआश्रमात देखील गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार आनंद आश्रमाच्या दरवाजापाशी गुढी उभारण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. यानंतर आनंद आश्रमातील स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन सभापती विलास जोशी, शिवसेना गटनेते पवन कदम आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT