Thane Ravindra Phatak vs Abhijit Pawar
ठाणे : ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समावेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या समावेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे या मतदारसंघात फाटक विरुद्ध पवार अशी थेट लढत पाहायला मिळेल.
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अपेक्षेनुसार शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून ठाणे विधान परिषदेची जागा शिवसेना सोडण्यात आली. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भरला.
यावेळी फाटक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के आमदार राजेश मोरे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, प्रमोद हिंदुराव, नजीब मुल्ला यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम त्यांनी आनंदाश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस हार घालून आशीर्वाद घेतला. त्यानंतर पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुसरीकडे महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठाण्याची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजित पवार यांना निवडणूक रिंगणात उतरून डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती मधील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अभिजीत पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यावेळी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले सर्वसामान्य घरातील अभिजीत पवार यांना उमेदवारी अर्ज उमेदवारी देण्यात आलेली आहे महायुती मधील नाराजीचा फायदा आम्हाला होऊ शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष कसा होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.