

ठाणे: महायुतीमध्ये ठाण्याची जागा शिवसेनेला दिल्याने रवींद्र फाटक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ते महायुतीचे उमेदवार म्हणून सोमवारी 12 वा. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिली असून त्यांचा उमेदवारही सोमवारीच अर्ज दाखल करेल. राष्ट्रवादीकडून ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजीत पवार हे अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे फाटक विरुद्ध पवार अशी लढत येथे होईल.
सध्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक मतदान करणार आहेत. प्रामुख्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या महापालिकांवर महायुतीचे वर्चस्व आहे, तर भिवंडी,वसई-विरार येथे महाविकास आघाडीचे अधिक मतदार आहेत.
या शिवाय अंबरनाथ, बदलापूर, पालघर, डहाणू, जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी नगरपालिकांचे नगरसेवकही या निवडणुकीत मतदार आहेत. मतांची संख्या पाहता महायुतीचे पारडे जड आहे. त्यामुळे रवी फाटक यांना विधान परिषदेवर निवडून जाण्याची संधी मिळू शकते.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल. भिवंडीत काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे नगरसेवक यांची संख्या अधिक आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी किती मते मिळवणार याकडे लक्ष असणार आहे. ठाकरे शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीत 7 अन्य महापालिकेचे 10 ते 12 नगरसेवक आहेत.