ठाणे : ठाण्यातील सर्व तलावांच्या तटांवर दरवर्षी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी शेकडो नागरिक श्राद्ध विधी, केस कापणे इत्यादी धार्मिक क्रिया करतात. हे धार्मिक विधी तलावांच्या ठिकाणी करण्यात येत असल्याने या विधींमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय हानी होत असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे. छट पूजेमुळेही पर्यावरणाची हानी होत असल्याने या विधींबद्दल आदर असला तरी तलावांच्या काठावर या विधी थांबवण्यात याव्यात, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ आणि ठाणे महापालिकेच्या तलाव संवर्धन समितीचे सदस्य रोहित जोशी यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सर्वपित्री अमावस्येच्या विधीनंतर पुष्प, नैवेद्य, केस, पिशव्या व अन्य अवशेष तलावकाठी फेकले जातात किंवा थेट तलावात टाकले जातात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते, जलीय पर्यावरणास हानी पोहोचते तसेच ठाण्याची ओळख असलेल्या आणि अभिमान असलेल्या तलावांच्या शहराचे सौंदर्य व पावित्र्य नष्ट होत असल्याचे जोशी यांनी आपल्या पात्रात म्हटले आहे.
जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम 1974 चे कलम 24 नुसार कोणत्याही व्यक्तीस जाणीवपूर्वक विषारी, हानिकारक किंवा प्रदूषक पदार्थ कोणत्याही प्रवाह, विहीर किंवा जलस्रोतामध्ये जाण्यास परवानगी देणे प्रतिबंधित आहे. तसेच, कलम 33(अ) नुसार अशा प्रकारे प्रदूषण करणार्या क्रियांकल्पांवर बंदी, नियंत्रण किंवा नियम लागू करण्यासह आदेश देण्याचे अधिकार प्राधिकरणास दिले असल्याची माहिती त्यांनी आपल्या निवेदनामध्ये दिली आहे.
एम.सी. मेहता विरुद्ध भारत संघराज्य (1988, गंगा प्रदूषण प्रकरण):सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही धार्मिक विधी ज्याने पर्यावरणीय हानी पोहोचेल तर त्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे आदेश दिले आहेत. तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन महापालिकेने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी काय करायला हवे?
1. सर्वपित्री अमावस्येला तलावांवर गर्दी व धार्मिक विधींना आळा घालणे.
2. नियंत्रित पर्यायी जागा निश्चित करणे, जेथे नागरिक धार्मिक विधी पर्यावरणास अपाय न पोहोचवता करू शकतील. जसे की गणेशोत्सवादरम्यान तयार करण्यात येणारे कृत्रिम तलाव.
3. सर्व प्रमुख तलावांकाठी (जसे की उपवन, रायलादेवी ई.) पोलीस व महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात करणे, जेणेकरून नियमांचे पालन होईल आणि तलावांत अनधिकृत कचरा टाकणे वा निर्माल्य, खाद्यपदार्थ, पूजासाहित्य, केस ई. विसर्जन होणार नाही.
4. जनजागृती करणे, याकरिता प्रसिद्धिपत्रके, सोशल मीडिया व इतर माध्यमांचा वापर करून तलावांचे रक्षण करण्याचे महत्त्व समजावून सांगणे.