ठाणे: ठाण्यातील राजकीय वरदहस्त असलेला कुख्यात गुंड सिद्धू अभंगे याला कोपरी भागातील जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी कोपरी पोलीस ठाण्यातच चांगला चोप दिला. गुंड अभंगे हा कोपरी भागात वर्षानुवर्षे जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून पैशाची मागणी करीत होता.
रविवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यातच ही हाणामारीची घटना घडली. कोपरी भागातील वर्षानुवर्षे जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून सिद्धू अभंगे याने व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील असे धमकावत हप्त्याची मागणी केली होती.
मात्र महिलांनी त्यास पैसे देण्यास नकार देऊन विरोध केला. हा व्यवसाय शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे साहेब यांच्या पुढाकाराने सुरू झाल्याचे महिलांकडून सांगण्यात आले. त्यानंतर देखील गुंड अभंगे याची गुंडगिरी सुरूच राहिली.
त्यानंतर हे प्रकरण थेट कोपरी पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र कोपरी पोलीस ठाण्यातच वाद आणखी वाढला व यावेळी व्यवसायिक महिलांनी सिद्धू अभंगे यास मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद शांत केला.
दरम्यान जुने कपडे विक्री करणाऱ्या महिलांनी गुंड अभंगे हा पैशाची मागणी करतो, आम्ही गरीब महिला खायचे काय? अन त्याला द्यायचे काय? असा सवाल करीत कायदेशीर कारवाईची मागमी केली आहे.
युट्युब भाई म्हणून ओळख
सिद्धू अभंगे हा ठाण्यातील कुख्यात गुंड असून तो देखील कोपरी परिसरात राहतो. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यास काही काळापूर्वी ठाण्यातून तडीपार देखील करण्यात आले होते.
आपल्या पंटर लोकांसोबत भाईगिरी करणारे व नेत्यांच्या सोबतचे व्हिडीओ युट्युबवर टाकून देखील तो प्रसिद्धी झोतात आला होता. गुंड अभंगेच्या व्हिडीओला लाखो व्ह्यू मिळत, त्यामुळे ठाण्याचा युट्युब भाई अशी देखील त्याची ओळख आहे.