Deputy Chief Minister Eknath Shinde inspection flooding
ठाणे : पावसाचा कहर ठाण्यातही सुरू असून शहरातील अनेक भागातील सखल भागात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली आहे. कोपरी भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने उपमुख्यमंत्री तथा स्थानिक आमदार एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता आयुक्त सौरभ राव यांनी रस्त्यावर उतरून यंत्रणा अधिकच सक्रिय केली आहे.
मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपून काढले आहे. सर्वत्र अंधार पसरला असून अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित होत आहे. कळव्यात तर नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. निसर्ग रम्य येऊर डोंगरावर ही पाणी साचले. वाघबीळ गावातील रस्ते पाण्यात बुडाले असून पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंब्रा, दिवा, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट भागात पाणी साचलेले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता प्रशासनाने घरीच राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.