

ठाणे : ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवाती बेन्नी असे मृत्यू झालेल्या स्पर्धकाचे नाव आहे.स्पर्धेत धावून घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ठाण्यातील हॅपी वॅली परिसरात राहणारे देवाती बेन्नी हे दरवर्षी वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत होते. विशेष म्हणजे ते दररोज व्यायाम शाळेतही जात होते. वर्षा मॅरेथॉनसाठी त्यांनी विशेष मेहनतही घेतली होती. ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या ३१ व्या वर्षा मॅरेथॉन मध्ये २१ किमी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा आटपून ज्यावेळी ते घरी आले त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवाती बेन्नी यांच्या मृत्यूमुळे ठाण्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे