शुभम साळुंके
ठाणे: मान्सूनच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना ठाणे जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत, बांधबंदिस्ती आणि पेरणीपूर्व कामे पूर्ण केली असली तरी भात पिकासाठी आवश्यक असलेले शासकीय अनुदानित बियाणे अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याने ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागणीच्या तुलनेत निम्मेच बियाणे उपलब्ध झाल्याने पंचायत समिती आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांसमोर वाटपाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठाणे जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर भात बियाण्यांचे वाटप केले जाते. जया, रत्ना, शुभांगी यांसारख्या भात वाणांना जिल्ह्यात मोठी मागणी असते.
यंदाही अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र महाबीज आणि अन्य शासकीय बियाणे उत्पादक संस्थांकडून मागणीच्या तुलनेत जवळपास निम्माच साठा उपलब्ध झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, खाजगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकरी अनुदानित शासकीय बियाण्यांवर अवलंबून आहेत. अनेक शेतकऱ्यांना खाजगी बियाणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शासकीय बियाण्यांची मागणी वर्षागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत पुरेसा साठा उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर बियाण्यांचे वाटप वेळेत सुरू होत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व नियोजन करणे सोपे जात होते. मात्र यंदा मागणीच्या तुलनेत कमी साठा उपलब्ध झाल्याने वाटप सुरू केल्यानंतर मोठी गर्दी आणि वाद निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाला भेडसावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बियाणे उपलब्ध असूनही वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नसल्याची माहिती ग्रामीण भागातून समोर येत आहे.
खरीप हंगाम जिल्ह्याच्या कृषी अर्थकारणाचा कणा मानला जातो. अशा वेळी शासन आणि कृषी विभागाने तातडीने अतिरिक्त बियाणा साठा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. अन्यथा पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची पेरणी रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधींनी देखील या प्रश्नात लक्ष घालून जिल्ह्यासाठी तातडीने अतिरिक्त बियाणे मंजूर करून आणावेत, अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे.