डोंबिवली (ठाणे) : एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत डेंग्यू, मलेरिया, टॉयफॉईडसारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असतानाच डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगर परिसरात एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचे वितरण होत असल्याने या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीकडून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने हा पुरवठा तातडीने थांबविण्याची मागणी भयभीत रहिवाशांनी केली आहे.
मिलापनगर परिसरातील रहिवाशांच्या घरात अचानक गढूळ पाणी आले. सुरुवातीला दूषित पाण्याचा पुरवठा आपल्याच घरात होत असल्याचे रहिवाशांना वाटले. रहिवाशांनी जलवाहिन्यांची तपासणी केली असता त्यांना जलवाहिन्या कोठेही फुटल्या नसल्याचे आणि त्यात दूषित पाणी जात नसल्याचे निदर्शनास आले. प्रत्येक घरात दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी आल्याने मिलापनगर भागातील रहिवाशांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. त्यावेळी मिलापनगर परिसराला एमआयडीसीकडून दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. जागरूक रहिवाशांनी ही माहिती तत्काळ एमआयडीसीच्या अधिकार्यांना दिली
अनेक घरांमध्ये एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. काही बंगलेधारकांनी पाणी साठविण्यासाठी टाक्या बांधल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात थेट पाणी येते. त्यांना या दूषित पाण्याचा सर्वाधिक त्रास झाला. ज्या इमारती आणि बंगल्यांवर पाणी साठविण्याच्या टाक्या आहेत. त्या टाक्यांमध्ये दुर्गंधीयुक्त दूषित पाणी जमा झाले होते. एमआयडीसी अधिकार्यांनी या तक्रारींची तत्काळ दखल घेतली. एमआयडीसी हद्दीत सतत नवीन काँक्रीट रस्त्यांचे खोदकाम, सेवा वाहिन्या टाकण्यात ठेकेदाराकडून एमआयडीसीच्या भूमिगत जलवाहिन्या फोडल्या जातात. हादरा बसलेल्या जलवाहिन्यांमध्ये पावसाचे पाणी, गटारांतील सांडपाणी घरात येते, अशी माहिती काही रहिवाशांनी दिली. पावसाळ्याच्या दिवसांत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.
या भागातील रहिवासी तथा डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी घरात येत असल्याची माहिती दिली. निवासी विभागात काँक्रीटचे रस्ते पुन्हा फोडून तेथे नव्याने रस्ता तयार करण्याची कामे सुरूकेली आहेत. ही कामे करतानाजेसीबी चालक अनेकदा निष्काळजीपणा करत असल्याने भूमिगत जलवाहिन्या, सेवा वाहिन्या तुटत आहेत.