Kalyan Industrial Land Acquisition Issues Pudhari
ठाणे

Kalyan News | भूमिपुत्रांचा विरोध मोडून काढण्यासाठी महिला बाउंसर : कल्याण ग्रामीणमध्ये दरारा

ठाणे पोलीस आयुक्तांनी दखल घेण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Thane Kalyan Industrial Land Acquisition Issues

ठाणे : कल्याण ग्रामीण भागातील जमिनींच्या प्रश्नावरून भूमिपुत्र आणि उद्योजक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असून, शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी महिला बाउंसरचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप भूमिपुत्रांनी केला आहे. महिला बाउंसर च्या उपस्थितीचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांवर ऍट्रिओसिटी, विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. सोनारपाडा आणि शीळ गावातील घटनांनंतर हा मुद्दा कल्याण ग्रामीणमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला असून, संबंधित प्रकाराची ठाणे पोलीस आयुक्तांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा गावात स्थानिक महिला आणि पुरुषांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरही स्थानिक भूमिपुत्रांनी गंभीर आरोप केले आहेत. या घटनेची चर्चा केवळ कल्याण-डोंबिवलीपुरती मर्यादित न राहता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील भूमिपुत्रांपर्यंत पोहोचल्याने संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शीळ - डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीळ गावातील जमिनीचा वादही पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या जागेवर न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करू देऊ नये, अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली आहे. मात्र, संबंधित जागेवर महिला बाउंसर तैनात करून शेतकऱ्यांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांवरही लाचखोरीचे आरोप करण्यात आले असून, या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

भूमिपुत्रांच्या म्हणण्यानुसार, जमिनीच्या वादात महिला बाउंसर समोर करून आंदोलक किंवा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये संबंधित पक्षांनी न्यायालयीन प्रक्रियेची प्रतीक्षा करावी आणि कायद्याच्या चौकटीतच कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

कल्याण ग्रामीणमधील विविध गावांमध्ये जमिनींच्या प्रश्नावर संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असताना महिला बाउंसरच्या वापराचा मुद्दा आता गंभीर बनला आहे. या प्रकरणांतील मारहाण, दमदाटी तसेच पोलिसांवरील करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भूमिपुत्रांकडून करण्यात येत आहे. अन्यथा जमिनीच्या प्रश्नावर ग्रामीण भागातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष बाब म्हणजे महिला बाउंसर च्या टोळ्या ग्रामीण भागात सक्रिय झाल्या आहेत. उद्योजकांकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांना गुन्ह्यात अडकवून उद्योजकांना जमिनीचा ताबा घेऊन देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागात महिला बाउन्सर चर्चेत आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT