Kalyan Station Congestion Free
डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी कल्याणच्या वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर त्यांचे स्वतःचे लक्ष आहे.
कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश सावंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गर्दीच्या पीक अवर्सच्या वेळेत दररोज विशेष वाहतूक नियोजन आणि कारवाई सुरू केली आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमाबरोबरच प्रवाशांना आवश्यक ती मदत करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी रिक्षा संघटनांच्या नियमित बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर रिक्षाचालकांनी स्थानकाबाहेर शिस्तबद्ध रांगेत उभे राहून प्रवाशांना इच्छित स्थळी तत्पर सेवा द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मुजोरपणे वागणाऱ्या रिक्षावाल्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कारवाई करण्यात येत असून, वाहतूक शिस्तीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. याशिवाय रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्याची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आहे. केडीएमसीच्या अतिक्रमण विभागामार्फत रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीमही सुरू आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होत असून, वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होण्यास मदत होत आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करून परिसर अधिक शिस्तबद्ध आणि वाहतूकमुक्त करण्यासाठी वाहतूक विभागाने सर्वंकष नियोजन केले आहे. या मोहिमेत वाहतूक नियंत्रण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त किरण बालवडकर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश सावंत यांच्या नेतृत्वाखालील प्रभावी अंमलबजावणीमुळे मोहिमेला गती मिळाली आहे. पादचारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अशाच प्रभावी कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाने स्पष्ट केले.