Kalyan Power Outage
डोंबिवली : कल्याण पूर्व आणि ग्रामीण परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या समस्येचा जाब विचारण्यासाठी आणि महावितरणच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कल्याण पश्चिम येथील कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात परिसरातील बाधित वीजग्राहक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचे प्रतीकात्मक स्वरूप दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काही काळ कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या दालनात मेणबत्त्या पेटवून महावितरणचा निषेध नोंदवण्यात आला, सर्वसामान्य नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्या व्यवस्थेने स्वतःही काही काळ अंधाराचा अनुभव घ्यावा असा संदेश या अनोख्या आंदोलनातून देण्यात आला.
बड्या उद्योजकांना काळ्या बाजारात वीज विक्री
यावेळी महावितरणच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गोरगरीब आणि सर्वसामान्य ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात तरीही त्यांना सुरळीत वीज मिळत नाही, मग गोरगरीबांच्या विजेची बचत करून ती छुप्या पद्धतीने बड्या उद्योजकांना आणि धनदांडग्यांना काळ्या बाजारात विकली जाते का ? असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. वारंवार वीज गायब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होत असून महिला व ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामांत नाहक त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांच्या मूलभूत गरजांशी खेळ खेळणे शिवसेना खपवून घेणार नाही असा संताप व्यक्त करण्यात आला.
सात दिवसांचा अल्टिमेट
कल्याण ग्रामीण आणि पूर्वेतील वीजपुरवठ्याची समस्या येत्या सात दिवसांच्या आत कायमस्वरूपी सोडवून पुरवठ्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. सात दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशाराही प्रशासनाला देण्यात आला. या आंदोलनामुळे महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता दिलेल्या सात दिवसांच्या मुदतीत वीजपुरवठा सुरळीत होतो का ? याकडे कल्याण ग्रामीण आणि पूर्व भागातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.