Kalyan Tanker Auto Rickshaw Accident AI photo
ठाणे

Kalyan Drunk Driver | कल्याणात मद्यधुंद टँकर चालकाचा धुमाकूळ: २ रिक्षा,८ दुचाकींना धडक; पाच जण जखमी

कल्याण स्टेशन रोड परिसरात दोन रिक्षा आणि सात ते आठ दुचाकींना जोरदार धडक देत पाच जणांना गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

Kalyan Tanker Auto Rickshaw Accident

डोंबिवली :
कल्याण स्टेशन रोड परिसरात शनिवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास एका मद्यधुंद पाण्याच्या टँकर चालकाने अक्षरशः धुमाकूळ घालत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने टँकर चालवत या चालकाने दोन रिक्षा आणि सात ते आठ दुचाकींना जोरदार धडक देत पाच जणांना गंभीर जखमी केले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सोनी कुमार गुल्लू असे या मद्यधुंद टँकर चालकाचे नाव असून तो साईबाबा वॉटर सप्लायर कंपनीचा टँकर चालवत होता. या भरधाव टँकरचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग ३ पासून आंबेडकर रोड, ताल हॉटेल ते पुष्पराज हॉटेलपर्यंत या चालकाने अत्यंत बेफामपणे आणि निष्काळजीपणे टँकर चालवला. रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक पादचारी आणि स्थानिक रहिवासी या घटनेत थोडक्यात बचावले असून, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिक आणि रिक्षाचालकांनी वारंवार हात दाखवून टँकर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने उलट वेग आणखी वाढवत पळ काढण्याचा प्रयत्न केला. अखेर हा टँकर डिव्हायडरला जाऊन धडकल्यानंतर नागरिकांनी त्याला पकडले. संतप्त नागरिकांनी या मद्यधुंद चालकाला चांगलाच चोप देत तातडीने महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.

या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना आणि रिक्षाचालकांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जखमी नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT