Thane Death Investigation
मिरा रोड : मिरा-भाईंदर महापालिकेच्या भाईंदरपूर्वेच्या गोल्डन नेस्ट येथील क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये २० एप्रिल रोजी ११ वर्षीय ग्रंथ मुथा बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली होती. या एक नवीन वळण आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सामाजिक कार्यकर्ते अॅड. कृष्णा गुप्ता यांच्या तक्रारीवरून राज्य मानवाधिकार आयोगाने महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना आठ आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोगासमोर होणार आहे.
पालिकेच्या मालकीच्या असलेल्या स्व गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये २० एप्रिल रोजी पोहणे शिकत असताना ग्रंथचा बुडून मृत्यू झाला. ग्रंथचे वडील हसमुख मुथा यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी प्रशिक्षित जीवरक्षक आणि योग्य जीवरक्षक व्यवस्था पुरवण्यात निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष केल्याचे सांगितले.
त्यानंतर नवघर पोलिस ठाण्यात चार प्रशिक्षक, ठेकेदार, साहस चॅरिटेबल ट्रस्ट आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोकांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे, महानगरपालिकेने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून चौकशी सुरू केली.
समितीने गेल्या महिन्यात प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपला तपास अहवाल सादर केला, तरीही कंत्राटदार आणि प्रशासकावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. घटनेला दीड महिना उलटूनही, शोकाकुल पालकांना त्यांच्या मुलासाठी न्याय आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी दारोदारी भटकंती करावी लागत आहे.