

Ashaile villagers agitation
उल्हासनगर : उल्हासनगर शहराजवळील आशाळेगाव येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर दहशत माजवली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले तर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरही ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठत ठिय्या आंदोलन केले.
आशेळे गाव मधील भक्ति पीठाजवळ ही घटना घडली असून, टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांचीही तोडफोड केली. या दहशतीत सचिन मोरे नावाच्या तरुणावर आणि त्यांच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला झाला. त्यांच्यासह आणखी एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हल्ला केल्याप्रकरणी ओम उर्फ पन्नी जगदाळे, साहील म्हात्रे, सुमित उर्फ लाल कदम, साहिल उर्फ सार्थक अहिरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मागील महिन्याभरापासून स्वप्निल कडू आणि इतर यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळची घटना घडल्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांवर कल्याण पूर्वच्या स्थानिक आमदार सुलभा गणपत गायकवाड त्यांनी कारवाईसाठी दबाव आणला. पोलिसांनी या दहशतखोरांवर योग्य कारवाई केली नाही तर ग्रामस्थ कायदा हातात घेतील, त्यावेळी मात्र ग्रामस्थांवरती तुम्हाला कारवाई करता येणार नाही अशा शब्दात धमकी वजा इशारा दिला.
बुधवारी दुपारी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यासमोर जमले. त्यांनी पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दोषींना तत्काळ अटक करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळेच गुंडांचे मनोबल वाढले आहे आणि सामान्य जनता असुरक्षिततेच्या छायेखाली जीवन जगते आहे. हल्ल्यात बाधित झालेल्या एका नागरिकाने सांगितले, आता रस्त्यावर चालणंही कठीण झालं आहे. घराच्या दारावर तलवारी मारून आम्हाला धमकावलं जातंय. कोणत्या क्षणी कुणी हल्ला करेल, काही सांगता येत नाही.
या आंदोलनात काही समाजसेवक, राजकीय नेते आणि स्थानिक प्रतिनिधीही सहभागी झाले होते. त्यांनीही पोलिस प्रशासनाला इशारा दिला की, जर दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक उग्र रूप धारण करेल. दरम्यान पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देताना सांगितले की, घटनेच्या गांभीर्याची दखल घेतली असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा उग्र हल्ला का झाला याचीही चौकशी सुरू आहे.