अनधिकृत फेरीवाल्यांवरून नगरसेवक आक्रमक pudhari photo
ठाणे

Thane hawkers issue : अनधिकृत फेरीवाल्यांवरून नगरसेवक आक्रमक

ठाण्यातील 7 हजार फेरीवाल्यांपैकी 2 हजार 788 फेरीवाल्यांनी दिले पुरावे

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून रस्ते, पदपथ अडवून अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पालिकेकडून कारवाईचा देखावा केला जात असल्याने लोकप्रतिनिधीच्या तक्रारींचा काय उपयोग होत नसून पुन्हा फेरीवाले रस्ते, पदपथांवर अतिक्रमण करीतच आहेत.

याला अतिक्रमण प्रतिबंधक विभाग जबाबदार असून फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या, स्थानिक फेरीवाल्यांना प्राधान्य द्या अशा सूचना सदस्यांनी महासभेत केल्या. तर सर्व्हेनुसार शहरातील 7 हजार फेरीवाल्यांपैकी केवळ 2 हजार 788 फेरीवाल्यांनी पुरावे सादर केल्याने त्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेरीवाल्यांचा प्रश्न गाजला. सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत ठाण्यातील अनधिकृत व्यवसायाला लगाम घालण्यासाठी आखण्यात आलेले फेरीवाला धोरण अद्याप प्रत्यक्षात लागू करण्यात आले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठाणे स्टेशन परिसर, मुख्य बाजार पेठ, गोखले रोड, गावदेवी मैदान परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत. या फेरीवाल्यांना पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याचा मुद्दा भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला. त्यांनी स्थानिक फेरीवाल्यांना प्राधान्य द्या, सर्वेक्षण करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या अशा सूचना केल्या. तर, ठाणे शहरात 2014 मध्ये शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली.

या समितीच्या मान्यतेने 2016 व 2019 मध्ये दोन टप्प्यात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर गेल्या 7 वर्षांत फेरीवाल्यांची संख्या तिप्पट-चौपट झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने होणारे सर्वेक्षण हे जुन्या अधिकृत फेरीवाल्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे सर्वात जुन्या अधिकृत फेरीवाल्यांना हॉकर्स झोन उपलब्ध करून द्यावे. त्यानंतरच नव्याने फेरीवाल्यांच्या यादीला मान्यता द्यावी, अशी मागणी नम्रता कोळी यांनी करीत ठाणे महापालिकेने खासगी कंपनीला देण्याऐवजी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका कोळी यांनी मांडली.

अनधिकृतपणे रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी, ही भूमिका नगरसेवकांनी प्रत्येक वेळेस का घ्यावी? अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करावी असे का वाटत नाही? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला. तर, अमित सरय्या यांनी प्रभाग क्रमांक 15 मधील मंगळवारच्या मार्केटमुळे नागरिकांना होणाऱ्या समस्येचा पाढा वाचला.

कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमणार

दरम्यान, प्रशासनाकडून उपायुक्त उमेश बिरारी यांनी फेरीवाल्यांना धोरणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. ठाणे पालिकेने फेरीवाल्यांचा सर्व्हे केला होता. सर्व्हेनुसार शहरात केवळ 7 हजार फेरीवाले असून त्यापैकी केवळ 2 हजार 788 फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असून त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. फेरीवाल्यांना समिती गठीत करण्यासाठी निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी मतदार यादी अद्ययावत नसल्याचे सांगत काही संघटनांनी त्यावर हरकती घेत, आधी यादी अद्ययावत करा, मगच निवडणूक घ्या अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे निवडणुकीच्या कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.

तसेच सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार सर्वेक्षणाच्या कामात खासगी संस्थेची मदत घेण्यात येईल, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यात येईल, फेरीवाल्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येणार, मुख्य बाजार पेठेसह प्रभाग क्रमांक 15 मधील मार्केटला भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT