मृत्यू File Photo
ठाणे

ठाणे : दगड खाणीत पडून ग्राम पंचायत सदस्याचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : बोईसर पूर्वेकडील दगड खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या एका दगड खाणीत एका ग्रामपंचायत सदस्याचा उंचावरून खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जयेश मोहन काकड (32) रा. काकडपाडा (नागझरी) असे मृत पावलेल्या ग्रा. पं. सदस्याचे नाव आहे. तो नागझरी ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य होता. दोन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. जयेश या ठिकाणी सुपरवायझरचे काम करत होता. खदानीमधून दगड का आले नाहीत, हे पाहण्यासाठी तो इथे गेला असता त्याचा पाय घसरून तो दगड खाणीत खाली पडून गंभीररित्या जखमी झाला.

त्याला नागझरी येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले असता मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मनोर येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेची मनोर पोलिसांनी नोंद करून घेत अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, दगडखाणींवर काम करणार्‍या कामगारांना दगडखाण मालक अथवा चालकाकडून आवश्यक साधने पुरवली जात नसल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT