Mukhyamantri Vayoshri Yojana  pudhari file photo
ठाणे

ठाणे : आनंदाची खबर! लाडक्या बहिणींनंतर आता वृद्धांना देखील मिळणार 3 हजार रुपये

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुख्यमंत्री वयोश्री योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 20 हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले आहेत. या योजनेंतर्गत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक वेळ एक रकमी 3 हजार रुपये मिळणार आहेत.

काय आहेत योजनेसाठी अटी

  • लाभार्थ्यांचे वय दि.31 डिसेंबर 2023 अखेर 65 वर्षे पूर्ण असावे.

  • त्या व्यक्तीकडे आधारकार्ड असणे आवश्यक.

  • लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयोश्री योजनेला गती मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले होते. या योजनेला ज्येष्ठ नागरिकांनीही चांगला प्रतिसाद देत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 20 हजार अर्ज दाखल केले आहेत.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला गती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घुगे यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता महत्वाच्या सूचना केल्या. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे आरोग्य शिबीराचे आयोजन करावे, शिबीरामध्ये आशा स्वयंसेविका यांच्या सहायाने 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे विहित नमुण्यातील अर्ज भरुन घ्यावेत अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या.

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंबलबजावणी नंतर आता वयोश्री योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.
संजय बागुल, समाजकल्याण विभागाचे अधिकारी

योजनेचे स्वरुप असे...

ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल. यासाठी पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक आधार ठरणार आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अर्ज दाखल करावे.
रोहन घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, ठाणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT