ठाणेकरांना लवकरच मिळणार घोडबंदरमध्ये तिसरे नाट्यगृह pudhari photo
ठाणे

New theatre in Thane : ठाणेकरांना लवकरच मिळणार घोडबंदरमध्ये तिसरे नाट्यगृह

विविध विकासकामांबरोबरच उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार नाट्यगृहाचे भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा दोन नाट्यगृहांबरोबरच आता ठाण्यात नवीन तिसरे नाट्यगृह घोडबंदर येथील गायमुख परिसरात उभे राहणार आहे. विस्तारलेल्या घोडबंदर मार्गाला नवीन नाट्यगृह असावे, अशी नागरिकांची देखील मागणी होती. त्यांनतर आता या नाट्यगृहाचे भूमिपूजन येत्या 16 डिसेंबरला करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री सरनाईक यांनी विविध विकासकामांच्या उद्घाटनाची घोषणा केली असून या सर्व विकासकामांची उद्घाटने देखील 16 डिसेंबरला करण्यात येणार आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी यावेळी दिली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यापैकी बहुतांश प्रकल्पअंतिम टप्प्यात असून या विकासकामांचे लोकार्पण, वाघबीळ येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन नाट्यगृहाचे भूमिपूजन महापालिका निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने अंतिम टप्प्यातील प्रकल्प 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावेत तसेच घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतरण आदी कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत दिले. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतुक) पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, या निधीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. ठाणे शहरातील एकूण 67 विहिरींचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या विहीरींचे पाणी पिण्यासाठी वापरता येणार आहे. तसेच स्मशानभूमींचे अत्याधुनिक पद्धतीने सुशोभीकरण, पाळीव प्राण्यासाठी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे डिजिटल ॲक्वेरियम तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांसाठी प्रत्येक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येत असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

ठाणे शहरातील 96 टन ओला कचऱ्याचे गायमुख येथील प्रकल्पाच्या माध्यमातून खत तयार केले जात असून हा राज्यातील पहिला खतनिर्मितीचा प्रकल्प असल्याचे सांगत कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सोलर डस्ट ही संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत प्रकल्पांचा आढावा

या बैठकीत ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघातील वर्तकनगर, नागलाबंदर खाडी किनारा सुशोभिकरण व मँग्रोव्ह उद्यानांची सद्यस्थिती, उपवन येथील धर्मवीर आनंद दिघे जिमखाना, आप्पासाहेब धर्माधिकारी भवन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण इमारत व सुधाकर चव्हाण बहुउद्देशिय इमारत, आनंदनगर येथील म्हाडाच्या माध्यमातून ऋतू इस्टेट येथील खुले रंगमंच व समाज मंदिर, कासारवडवली येथील श्रीराम मंदिर, तलाव सुशोभीकरण, आनंदनगर स्पोर्ट्‌‍स कॉम्प्लेक्स व फूटबॉल टर्फ, लोकाशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय आदी प्रकल्पांचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. घोडबंदर रोडवर विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT