

ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून वेश्याव्यवसाय चालवून पैसे कमविणाऱ्या दोन दलालांना बेड्या ठोकण्याची कारवाई वागळे इस्टेट पोलिसांनी केल्याची माहिती वपोनि शिवाजी गवारे यांनी दिली आहे.
दरम्यान अटक करण्यात आलेले दलाल हे ठाण्यासह अनेक भागातील इतर ठिकाणच्या ऑर्केष्ट्रा बारमध्ये कार्यरत होते. वागळे इस्टेट, लुईसवाडी परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये हे दलाल वेश्यागमनासाठी महिला घेऊन येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून टाकलेल्या छाप्यात ते दोघे दलाल आढळून आले. दलाल त्रिपाठी हा ठाण्यात तर शेख मीरा भाईंदर परिसरात राहणारा आहे. त्यांच्या रखवालीतून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पिटा ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या पथकाने केली. पुढील तपास वागळे इस्टेटचे पोलीस करत आहेत.