Water Supply  file photo
ठाणे

Thane Ghodbunder Road Water Supply : घोडबंदर रोडवरील नव्या इमारतींची पाणीजोडणी बंद

कार्यकारी अभियंत्यांकडून मात्र अनधिकृत बांधकामांना पाणीजोडणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : घोडबंदर रोडवरील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नव्या इमारतींना पाणी जोडण्या देण्यासाठी सहा वर्षांपासून तीव्र विरोध केला जात होता. अखेर नव्या इमारतींना पाणी न देण्याच्या ठाणे महापालिकेने निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अधिकृत इमारतींना नवीन पाणी न देण्याचा निर्णय घेणाऱ्या महापालिकेचे माजिवडा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता संजय कदम हे अनधिकृत बांधकामांना अधिकृतपणे नळ जोडणी देण्यासाठी नवीन सिमेंट रस्ते फोडण्याची परवानग्या देत सुटले आहेत.

घोडबंदर रोडवर नवीन गृह संकुले उभारणी सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे जुन्या रहिवाशांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले होते. या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. मे २०१७ मध्ये झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने घोडबंदर रोडवरील बांधकामांच्या सीसी आणि ओसी देण्यासाठी स्थगिती दिली होती.

त्यावेळी महापालिकेने प्रतिज्ञापत्रात २०१२ ते २०१७ दरम्यान २०६ प्रकल्पांना १४७८ पाणीजोडण्या दिल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. तसेच या भागात पाणीटंचाई नसून, वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. ओसी नसल्याचा फटका त्यावेळी २८५ इमारतींना बसला होता. कालांतराने ऑक्टोबर २०१७ मध्ये स्थगिती उठविण्यात आली होती.

या भागातील रहिवाशांनी ऐन पावसाळ्याच्या काळातही पाणीटंचाई अनुभवली आहे. कोरोना संसर्ग सुरू असताना सप्टेंबर २०२० मध्ये नव्या बांधकामांना पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्याची महापालिकेकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे टँकर लॉबी फोफावून नागरिकांना पाणी विकत घेण्यासाठी नाहक भुर्दंड सोसावा लागत होता. महापालिकेने वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्याचे न्यायालयात म्हटले होते. मात्र, ते नियोजन प्रत्यक्षात साकारले नाही.

विशेषत: नव्या इमारतीत राहण्यासाठी येणार्‍या नागरिकांचीही पाणी नसल्यामुळे फसवणूक होत होती. इमारतीतील रहिवाशांना घरांचा ताबा देऊन बिल्डर निघून जात होता. त्यानंतर रहिवाशांचे हाल होतात. त्यावेळी संबंधित सोसायटीतील नागरिक नगरसेवकांकडे धाव घेतात. या पाणीटंचाईचे विनाकारण खापर नगरसेवकांवर फोडले जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीबंदीचा घेतलेला निर्णय योग्य आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली.

आता पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारच्या निर्देशानुसार नवीन इमारतींना नळ जोडणी देणे बंद करण्यात आले आहे. नवीन इमारतींना पाणी पुरवठा करायचा नाही असा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. दुसरीकडे अधिकृत इमारतींना पाणी पुरवठा करायचा नाही असे धोरण पालिकेने घेतले असताना माजिवडा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता संजय कदम हे नवीन सिमेंटचे रस्ते खोदून अनधिकृत बांधकामांना नवीन जल वाहिन्या टाकण्यासाठी सर्रासपणे परवानग्या देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT