उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा सर्व यंत्रणांची बैठक घेतली. Pudhari Photo
ठाणे

Thane Ghodbunder News | घोडबंदर रोडवर अवजड वाहने धावल्यास पोलिसांवरच होणार कारवाई !

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश : दिवसा अवजड वाहनांना बंदी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : खड्डेमय घोडबंदर रस्त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रस्त झाल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले. मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी कायम राहिली. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी कडक आदेश दिले आहेत. रात्री उशीरा सर्व यंत्रणांची बैठक घेवून घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजलेनंतरच जड वाहने सोडण्याचे आदेश दिले आहेत. जर याची अंमलबजावणी झाली नाही तर पोलिसांवरच कारवाई करा अशा सूचनाही दिल्‍या आहेत. या आदेशाची तरी अंमलबजावणी होणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान रात्री बारापूर्वी वाहने सोडणाऱ्या आणि वेळेच बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री शिंदे यांनी समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले. घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीमुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांनी खड्ड्यात खाली डोके वर पाय करून सरकारचा निषेध केला. हळूहळू नागरिक रस्त्यावर उतरू लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा बैठक घेतली. वाहतूक कोंडीच्या या त्रासातून मुक्तता करणे हे अतिशय महत्वाचे असून घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या. त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याचे नियोजन करण्यासही सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॅा. श्रीकृष्ण पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलिस आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक, मीरा भायंदर पोलिस आयुक्त, मीरा भायंदर महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी जेएनपीटीकडून घोडबंदर रस्त्यावर येणारी वाहने रात्री १२ नंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या तसेच याबाबत नियोजन करण्याबाबत नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त काकडे यांना सांगितले.

त्याचबरोबर मीरा भाईंदरचे पोलिस आयुक्त निकीत कौशिक, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख यांना दूरध्वनीवरून अहमदाबादकडून घोडबंदर रोडकडे येणारी वाहनेही रात्री १२ वाजलेनंतर सोडण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याबरोबर या जड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी या ठिकाणी पार्किगची व्यवस्था करून जड वाहनांचे नियोजन करावे असे सांगितले.

या बैठकीला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वाहतूक पोलिस शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट, पोलिस उप आयुक्त प्रशांत कदम आणि जस्टीस फॅार घोडबंदर रोडचे पंकज सिन्हा, गिरीष पाटील आणि ऍड. राधिका राणे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT