Thane Noise Pollution Pudhari
ठाणे

Thane Noise Pollution: डीजे-डॉल्बीचा दणदणाट कमी; ढोल-ताशा, बेंजोमुळे मात्र ध्वनिप्रदूषण कायम

ठाण्यात दीड दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये १०० डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकांमधील ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न यंदाही कायम असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या दीड दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान शहरातील विविध भागांत ८० ते ९५ डेसिबलपर्यंत ध्वनीपातळी नोंदवण्यात आली.

तलावपाळी येथील पी. एन. गाडगीळ शोरूमजवळ तर डीजे आणि ढोल-ताशांच्या एकत्रित आवाजामुळे ध्वनीपातळी तब्बल ९५ ते १०० डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे पाहणीत आढळले. विशेष म्हणजे, यंदाच्या मिरवणुकांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत डीजे-डॉल्बीच्या वापरामध्ये सुमारे २० टक्क्यांनी घट झाल्याचे निरीक्षण सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले आहे.

मात्र, डीजेचा वापर कमी झाला असला तरी त्याची जागा बँजो, ढोल-ताशे व मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांनी घेतल्याने एकूण ध्वनीप्रदूषणात अपेक्षित घट झालेली नाही.

ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशे, बँजो, ध्वनिवर्धक तसेच डीजे-डॉल्बीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे मिरवणुकांच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होतो.

यंदा डीजे-डॉल्बीचा वापर तुलनेने कमी झाल्याने काहीसा सकारात्मक बदल दिसून आला. डॉ. महेश बेडेकर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील विविध भागांत ध्वनीमापक यंत्राच्या माध्यमातून आवाजाची पातळी मोजली. रात्री ८.४५ वाजता राम मारुती रोड येथे ९० डेसिबल, ८.५३ वाजता नौपाडा पोलिस ठाण्याजवळ ९५ डेसिबल, तर ९.१० वाजता राम मारुती रोडवरील आयसीआयसीआय बँकेजवळ ९० ते ९५ डेसिबल ध्वनीपातळी नोंदवण्यात आली.

त्यानंतर रात्री ९.४० वाजता शिवाईनगर येथे ९० ते ९५ डेसिबल, तर १०.१० वाजता पाचपाखाडी येथेही ९० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. रात्री ११ वाजता राम मारुती रोड येथे डीजे आणि ढोल-ताशांमुळे ९० ते ९५ डेसिबल ध्वनीपातळी नोंदवण्यात आली.

अवघ्या पाच मिनिटांनी तलावपाळी येथील पी. एन. गाडगीळ शोरूमजवळ डीजे आणि अनेक ढोलांच्या आवाजामुळे ध्वनीपातळी ९५ ते १०० डेसिबलपर्यंत पोहोचली. रात्री ११.०७ वाजता तलावपाळी येथेही डीजे आणि ढोल-ताशांमुळे ९० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली.

विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची उपस्थिती आणि वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते. मात्र, ध्वनीपातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असतानाही संबंधित यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत.

त्यामुळे डीजे-डॉल्बीचा वापर कमी झाल्याची सकारात्मक बाब असली तरी ध्वनीप्रदूषणावर प्रभावी नियंत्रणासाठी पुढील काळात अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

“यंदा डीजे आणि डॉल्बीच्या वापरामध्ये मागील वर्षांच्या तुलनेत सुमारे २० टक्के घट जाणवली असून लोकांनी हा बदल ठरवून केल्याचे दिसून येते. मात्र, अनेक मिरवणुकांमध्ये बेंजो, ढोल-ताशे आणि ध्वनिवर्धकांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याने ध्वनीपातळी ८० ते ९५ डेसिबलपर्यंत राहिली. तर वाहतूक व्यवस्थापन योग्य प्रकारे झाले.”
- डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT