मुरबाड : शाळेत पाल्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नसल्याने शनिवारी (दि.5) मुरबाड तालुक्यातील खांडपे गावच्या पालकांनी जिल्हा परिषद शाळेतून आपल्या पाल्यांना थेट घरी नेल्याचा पवित्रा घेतला होता.
याबाबत आपल्या तीव्र भावना शासन दरबारी पोहचविण्यासाठी त्यांनी दै. पुढारीशी संपर्क साधला असता रविवारच्या अंकातून ही वस्तुनिष्ठ वृत्त प्रसारित करण्यात आली होती. तर या बातमीने मुरबाडच्या शिक्षण विभागाला जाग येऊन त्यांनी ताबडतोब दुसर्या दिवशी सोमवारी या शाळेवर तातडीने दोन शिक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे खांडपे गावातील पालक व विद्यार्थी वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण असून संपूर्ण पालक, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीने दै. पुढारीचे भरभरून आभार मानले आहेत.
मुरबाड तालुक्यातील खांडपे जिल्हा परिषद शाळेची सुमारे 75 विद्यार्थी पटसंख्या असतांना केवळ दोनच शिक्षक या शाळेचा कारभार सांभाळत होते. त्यामुळे अद्याप दोन शिक्षकांच्या मागणीसाठी शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी अनेकदा मुरबाडच्या पंचायत समिती शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केले होते.
परंतु शिक्षण विभागाने या अर्जांना केराची टोफली दाखवत आजतागायत त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी शनिवारी 5 ऑक्टोंबर रोजी आपल्या पाल्यांना शाळेतून थेट घराकडे घेऊन गेले व दै. पुढारीशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार घडलेल्या घटनेचा वृत्त प्रसारित करण्यात आले होते.