

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील खांडपे गावच्या जिल्हा परिषद शाळेत पुरेशी शिक्षकांची संख्या नसल्याने पालकांनी शिक्षण विभागाचा निषेध करून आपल्या पाल्यांना शाळेतून थेट घरी घेऊन गेले असल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षक नसतील तर मुलांना शाळेत पाठवून उपयोग काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सुमारे 73 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या खांडपे गावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांचा अध्यापनाचा भार 2 शिक्षक सांभाळत आहेत. मात्र अद्याप 2 शिक्षकांची आवश्यकता असल्याने शिक्षण विभागाने ते द्यावेत, अन्यथा आम्ही मुलांना घरीच ठेऊ, असा पवित्रा खांडपे ग्रामस्थांनी घेतला आहे.
या प्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीने वेळोवेळी मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करून शिक्षकांची मागणी केली होती. मात्र शिक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष करून आजतागायत शिक्षक उपलब्ध करून न दिल्याने अखेर आज (दि. 5 रोजी) खांडपे गावातील पालकांनी शाळेच्या पटांगणात जमून शिक्षण विभाजगा विरोधात संताप व्यक्त केला.
तसेच शाळेला शिक्षक नसल्याने आपल्या पाल्यांना येथे ठेवण्याऐवजी शिक्षक नियुक्ती होईपर्यंत घरी ठेवण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला. यावेळी चिमुकल्या विध्यार्थ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रियेंतून संवेदना व्यक्त केल्या. याबाबत अधिक माहितीसाठी मुरबाड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट शिक्षण अधिकारी संपदा पानसरे यांचेशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला असता कॉल रिसिव्ह न केल्याने चर्चा होऊ शकली नाही.