ठाणे: संयुक्त कुटुंब पद्धती हळूहळू संपुष्टात येत असून एकाच घरात राहणारी माणसे देखील एकमेकांशी बोलनाशी होऊ लागली आहेत. तणावग्रस्त व धावपळीची जीवनशैली, मोबाईलचा अतिवापर, सोशल मिडियाचे जीवनात शिरकाव आदी कारणांमुळे नात्यात दुरावा येऊ लागला आहे.
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ठाण्यात गेल्या आठ महिन्यात पाचशेहुन अधिक घटस्फोटासाठी अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत.
दरम्यान, कौटुंबिक हिंसाचार अथवा वैवाहिक वादात घटनेत सरळ गुन्हा दाखल न करता पोलिसांकडून पीडित कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात येत असल्याने बरीच प्रकरणे आपापसात मिटवण्यात येतात.
ताणतणाव व धावपळीच्या जीवनशैलीमुळे कौटुंबिक कलहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता कुटुंबातील वाद थेट पोलीस व कौटुंबिक न्यायालयापर्यंत पोहचू लागला आहे. कौटुंबिक वादाच्या तक्रारींचा आलेख वर्षागणिक उंचावतच आहे.
२०२४ या वर्षभराच्या काळात ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ४४८ कौटुंबिक हिंसाचार व महिला छळवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ हुंडाबळीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२०२५ मध्ये ४५१ कौटुंबिक हिंसाचार व महिला छळवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. कौटुंबिक वादाची वाढती प्रकरणे लक्षात घेता या तक्रारी रोखण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
राज्य विधी सेवा प्राधिकरण, कौटुंबिक न्यायालय आणि राज्य पोलिसांच्या भरोसा सेलच्या वतीने पारिवारिक वादात समुपदेशन करून तो वाद आपापसात मिटवण्यावर अधिक भर दिला जात आहे.
कौटुंबिक वादात पती-पत्नींमधील भांडणे चार भिंतीतच राहिली पाहिजे, याकडे अधिकतर जोडप्यांचा कल असतो, त्यामुळे पती – पत्नींना व्यक्त होणे, मुश्कील होते. न्यायालयात खटला दाखल झाला की जोडप्यांचा वेळ, पैसा खर्च होतोच पण दैनंदिन जगण्यांवरही परिणाम होतो.
कौटुंबिक वाद किंवा ताणतणावातून जाणा-या जोडप्यांना व्यक्त होण्यासाठी, त्यांचे ताणतणाव मांडण्यासाठी चला बोलूया हा कुटुंब न्यायालयाने समुपदेशन कक्षामार्फत सुरू केला आहे.
पोलिसांच्या भरोसा सेलच्या वतीने देखील पारिवारिक वाद सामंजस्याने मिटवण्यावर भर दिला जातो. हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्याय कुठे मागावा, हेच समजत नाही.
त्यामुळे पीडित महिलांच्या मदतीसाठी पोलीसांनी पोलीस दीदी, दामिनी पथक, पोलीस काका अशा विविध पथकांची पोलीस स्टेशन स्तरावर स्थापना केली आहे. तर पोलिसांच्या महिला तक्रार निवारण कक्षात देखील कारवाई पेक्षा वाद आपसात मिटवण्यावर अधिक भर दिला जातो.
सोशल मीडिया, मोबाइलमुळे दुरावतात नाती
वाढत्या कौटुंबिक वादाला मोबाईल नावाचे भूत कारणीभूत ठरत आहे. लग्नात मानपान किंवा हुंडा दिला नाही, स्वयंपाक येत नाही, सासु-सासरे छळ करतात, अशा स्वरूपाची कारणे यापूर्वी पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत होती.
मात्र, आता यात सोशल मीडिया व मोबाईलशी संबंधित कारणेही वाढू लागली आहेत. विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार २०२५ या वर्षभरात राज्यात २९ हजाराहून अधिक घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आले आहेत. त्यापैकी तीस टक्के प्रकरणांत घटस्फोटासाठी मोबाईल अथवा सोशल मीडियाचे कारण पुढे करण्यात आले आहे.
३१ टक्के गुन्हे कौटुंबिक वादातून
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, भारतात महिलांविरुद्ध होणाऱ्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वाधिक गुन्हे म्हणजेच ३१ टक्के गुन्हे कौटुंबिक वादातून दाखल होतात. भारतातील १५ ते ४९ वयोगटातील अंदाजे ३१ टक्के विवाहित महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी शारीरिक, भावनिक किंवा लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे असे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे या पाहणी अहवालातून समोर आले आहे.यामध्ये शारीरिक हिंसाचार २८ टक्के भावनिक हिंसाचार १३ टक्के आणि लैंगिक हिंसाचार ५.७ टक्के इतका आढळला आहे.