ठाणे: ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ रस्त्यावर थुंकणाऱ्या परप्रांतीय चालकाला एका वृद्धाने जाब विचारला. त्याचा राग येऊन त्या चालकांना वृद्धाला बेदम मारहाण करीत जखमी केले आहे. याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमाअंतर्गत ( हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेत.
मंगळवारी संध्याकाळी रस्त्यावर थुंकणाऱ्या परप्रांतीय चालकाला एका वृद्धाने जाब विचारल्यानंतर या चालकाने खाली उतरून या वृद्धाला बेदम मारहाण केली. तसेच त्या चालकाने वृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी हातात दगड घेतल्याचेही चित्रफितीत स्पष्टपणे दिसत आहे.
अशा प्रकारे जाब विचारणाऱ्याला गंभीर मारहाण होणार असेल तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही. या घटनेत सदर वृद्धाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेत स्थानिक शिवसैनिकांनी या चालकाला शोधून अद्दल घडवून त्याला वर्तक नगर पोलीस स्थानकात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
मात्र ही घटना समजताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन परप्रांतीय चालकावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे यांना दिले आहेत.