ठाणे: प्लास्टिक आणि पीओपीला हद्दपार करत यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने कंबर कसली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत, हिरानंदानी इस्टेट येथील जैवविविधता उद्यानात शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीच्या भव्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पर्यावरणपूरक मूर्तिकारांना जागा आणि शाडू माती विनामूल्य देण्याची धडक घोषणा पालिकेने केली आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पालिका आयुक्त सौरभ राव आणि मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेत नागरिकांना शाडूच्या मूर्ती बनवण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक मूर्तींबाबत योग्य जागरूकता निर्माण झाल्यास, शाडूच्या मूर्तींच्या वापरात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल पाचपट वाढ होईल, असा ठाम विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी व्यक्त केला. मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने मोफत जागा आणि माती देण्याची योजना आखली आहे.
यासाठी पालिकेच्या महिला बचत गटाच्या प्रयोगशाळेत तब्बल 12 टन शाडू मातीआधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे पालिकेच्या या पर्यावरणस्नेही पाऊलामुळे यंदा ठाण्यात बाप्पाचे आगमन अधिक सात्विक आणि निसर्गपूरक वातावरणात होणार हे नक्की!
शाळा आणि सोसायट्यांमध्ये जनजागृती
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केवळ मूर्तिकारांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही या मोहिमेत सामावून घेण्याचे ठरवले आहे. मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी पालिकेचा आगामी कृती आराखडा जाहीर केला. जुलै 2026 पासून: शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत विशेष जनजागृती मोहीम आणि पथनाट्ये रंगणार आहेत.
ऑगस्ट 2026 पासून गृहनिर्माण संस्था व सोसायट्यांमध्ये थेट नागरिकांसाठी शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत: 15 जून 2026 (संबंधित प्रभाग समिती कार्यालयात)
जागा व माती वाटप : 15 जुलै 2026 पर्यंत (अर्जांची छाननी करून उपलब्धतेनुसार)