ठाणे : ठाणे आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहिती नुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा 608 सार्वजनिक व 32,554 खासगी दुर्गादेवींची स्थापना होणार आहे तसेच एकूण 133 सार्वजनिक व 287 खासगी देवीचे फोटो/प्रतिमांची स्थापना होणार आहे. या दरम्यान ठाणे आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत नवरात्रोत्सव आणि रास गरबा नृत्याचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येते. या नवरात्रोत्सवात गरबा नृत्य करताना लावण्यात येणार्या प्लाझमा बिन लाईट, लेझर बिम लाईट आणि लेखार किम लाईट लावण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातून प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविली आहे. तर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
नवरात्रोत्सवासाठी जम्बो पोलीस बंदोबस्त
नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा, या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त-10, सहाय्यक पोलीस आयुक्त-18, पोलीस निरीक्षक-16, सपोनि/पोउपनि-44, महिला पोलीस अधिकारी-33, पुरुष अंमलदार-2673, महिला अंमलदार 610, एसआरपीएफ कंपनी-01, जीप-52, 5 टनी-20, वा.संच 35, वॉकी टॉकी 100, दुर्बीण 02, डीएफ एमडी-1 आणि 2 असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मुख्यालय मीना मकवाना यांनी दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमात नवरात्रोत्सवात धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेजेस, पोस्ट, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकणार्यांवर लक्ष ठेवून त्वरित कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सोशल मिडीया सेल देखील सर्तक करण्यात आले आहे. तसेच असे काही मॅसेजेस, पोस्ट, व्हीडिओबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस ठाण्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्त, ठाणे शहरकडून जनतेला केले आहे.