नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील अति संवेदनशील परिसरात ड्रोनच्या घिरट्या सूरू असल्याचा प्रकार दैनिक पुढारीने प्रकाश झोतात आणला आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या सुरक्षा यंत्रणांनी प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सह स्थानिक पोलिसांच्या पथकांकडून देखील ड्रोन उडवणार्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दै. पुढारीला दिली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील परिसरात असलेल्या अति संवेदनशील भागात ड्रोन द्वारे चित्रीकरण करून सोशल मीडियावर रिल्स अपलोड करण्यात आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांचा सुरू झालेला हा तपास ड्रोन उडवणार्यां पर्यंत कधीपर्यंत पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणार्या ग्रामीण भागात ड्रोन उडवण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीमलंगगड, चिंचवली या परिसराचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर अति संवेदनशील असल्याने सदरच्या परिसरात रोड उडवताना नियमांचं उल्लंघन होत आहे.
चिंचवली या गावाच्या परिसरात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर असल्याने सुरक्षा यंत्रणांनी या आधीच सदर परिसरात ड्रोन उडवण्यास मनाई असल्याचा फलक झळकवला आहे. मात्र शासकीय यंत्रणांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून सर्रास ड्रोन उडवून व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. या संदर्भातील वृत्त दै. पुढारीने प्रकाश झोतात आणल्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांसह ठाणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा, हिल लाईन पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्यांकडे तातडीच्या बैठकीची मागणी
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात सुरू असलेल्या या अनागोंदी कारभाराविरोधात तसेच सुरक्षिततेच्या संदर्भात ठाणे जिल्हाधिकार्यांकडे तातडीच्या बैठकीची मागणी करण्यात आली आहे. भूमिपुत्र धर्माभिमानी संघ ठाणे, मनसेचे अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष हेमंत मढवी यांनी सुरक्षितते संदर्भात महसूल विभाग महानगरपालिकांचे अधिकारी तसेच पोलीस उपायुक्त सह तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्याचे निवेदन ठाणे जिल्हाधिकार्यांना दिल आहे.