Dombivli Thakurli Naxalite Arrested Pudhari
ठाणे

Dombivli Naxalite Arrested | १० लाखांचे बक्षीसपात्र नक्षलवादी ठाकुर्लीतून जेरबंद : गवळ्याच्या वेशात काढायचा गायींची धार

ठाकुर्ली परिसरातून एटीएसला मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Thakurli Naxalite Arrested

डोंबिवली : दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अर्थात एटीएसने अशी धडाकेबाज कारवाई केली आहे की संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, झारखंडमधील फरार नक्षलवादी संजय सरोज यादव ऊर्फ संजय गोदराई ऊर्फ बुधराम (४५) याला डोंबिवली जवळच्या ठाकुर्ली परिसरातून एटीएसने मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. झारखंड सरकारने या कुख्यात नक्षलवाद्यावर तब्बल १० लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते, एवढा मोठा बक्षीसपात्र नक्षलवादी थेट आपल्या ठाकुर्लीत लपून बसला होता, ही बातमी समजताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयित नक्षलवादी गेल्या सुमारे दहा दिवसांपासून ठाकुर्ली परिसरात नाव आणि ओळख लपवून राहत होता. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या नक्षलवाद्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. तो सामान्य माणसासारखा वावरत होता. पण त्याच्या हालचालींवर एटीएसची करडी नजर होती. योग्य वेळ साधून एटीएसच्या पथकाने त्याला कोणतीही संधी न देता बेड्या ठोकल्या. त्यामुळे दिवाळीत काही मोठा घातपात घडवण्याचा डाव तर नव्हता ना असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

गवळ्याचा मुखवटा पांघरूण काढायचा गाईंची धार

विशेष म्हणजे गाईंची देखभाल आणि दूध काढण्याचे काम करत त्याने आपली ओळख लपवली होती. गेल्या दहा दिवसांपासून तो ठाकुर्ली परिसरात एका सामान्य गवळ्याच्या वेषात राहत होता. सकाळी गाईंची धार काढायची, गोठ्याची साफसफाई करायची, परिसरातल्या लोकांशी अगदी साध्यासुध्या माणसासारखा वागायचा. त्यामुळे तो एवढा मोठा नक्षलवादी आहे याचा कुणालाच संशय आला नाही.

पण झारखंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे एटीएसने ही कारवाई केली आहे. झारखंड पोलिसांनी दिलेल्या पक्क्या माहितीवरून एटीएसचे पथक ठाकुर्लीत पोहोचले आणि त्यांनी त्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवली. योग्य वेळ साधून एटीएसच्या पथकाने त्याला कोणतीही संधी न देता बेड्या ठोकल्या. त्यामुळे दिवाळीत मोठा घातपात घडविण्याचा डाव तर नव्हता ना ? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

दिवाळीत घातपाताचा मनसुबा उधळला

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात १० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी गवळ्याच्या वेषात आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. तो ठाकुर्लीत कुणाच्या संपर्कात होता ? महाराष्ट्रात येण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता ? त्याचे अन्य नक्षली संघटनांशी किंवा स्थानिक गुन्हेगारांशी संबंध आहेत का ? तो इथे लपण्यासाठी आला होता की काही मोठे कृत्य करण्याच्या तयारीत होता ?

गाईंच्या गोठ्यात काम करत असताना त्याने कुणाकुणाशी संपर्क साधला होता ? या दिशेने एटीएसकडून कसून तपास सुरू आहे. त्याच्या मोबाईल, कागदपत्रे आणि संपर्कातील व्यक्तींची सखोल चौकशी केली जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एटीएसच्या या कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा आता डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याण परिसरात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT