Dombivli Footpath Encroachment
डोंबिवली : एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून रस्ते व फुटपाथ बळकावणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात व्यापक कारवाई सुरू असताना, दुसरीकडे पादचाऱ्यांच्या हक्काच्या फुटपाथवर आता वाहनांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली असून गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसराला फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्टेशन परिसरासह उर्सेकर वाडी भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली. तसेच स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवरही कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार ६/फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि ८/ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई केली. या मोहिमेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र, कारवाईनंतरही अनेक ठिकाणी दुकानदारांनी फुटपाथवर सामान ठेवणे, फेरीवाल्यांना बसू देणे तसेच दुचाकी आणि इतर वाहने उभी करून पादचाऱ्यांचा मार्ग अडविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारहाटासाठी ये-जा करणाऱ्या गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना रस्त्यावरून अंग चोरून चालावे लागत आहे. विशेष म्हणजे फ प्रभागाच्या कार्यालयाच्या इमारतीखालील काही दुकानदारांनीही फुटपाथवर दुचाकी उभ्या करून पादचाऱ्यांना अडचण निर्माण केल्याचे दिसून आले.
दरम्यान, रामनगर पोलिस ठाण्यासमोरील परिसरात अद्याप फेरीवाले, भाजी विक्रेते तसेच लस्सी आणि ताक विक्रेत्यांवर कारवाई न झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी दुकानदारच आपल्या दुकानांसमोर फेरीवाल्यांना बसवतात आणि कारवाईच्या वेळी त्यांचा माल दुकानात लपवून ठेवतात, अशीही तक्रार नागरिकांनी केली आहे.
ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातही अशीच परिस्थिती असून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात हातगाड्या आणि ठेले उभे असल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा राहत नाही. त्यामुळे या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर ८/ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि ६/फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन फुटपाथ मोकळे करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.