Dombivli Hotel Worker Throat Cut Pudhari
ठाणे

Dombivli Crime | डोंबिवलीत बुकिंग ऑर्डरवरून डिलिव्हरी रायडरने हॉटेल कर्मचाऱ्याचा गळा चिरला

डिलिव्हरी बुकिंगची ऑर्डर तुझ्या नावावर का फिरवली ? या क्षुल्लक कारणावरून हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Hotel Worker Throat Cut

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणावर त्याच हॉटेलच्या डिलिव्हरी रायडरने दारूच्या नशेत येऊन चाकूने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीची डिलिव्हरी बुकिंगची ऑर्डर तुझ्या नावावर का फिरवली ? या क्षुल्लक कारणावरून हा हल्ला झाल्याचे जखमी तरूणाने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. एकीकडे या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

या प्रकरणातील फिर्यादी ऋषी दिनेश जयस्वाल (१९, रा. गायत्री इन्क्लेव्ह सोसायटी, मलंगगड रोड, कल्याण-पूर्व) हा तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये रात्री ८ ते १ या वेळेत गिऱ्हाईकांची डिलिव्हरी करून देण्याचे आणि लॉबीमध्ये बसून ऑर्डर घेऊन होम डिलिव्हरीचे काम करतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

गुरूवारी १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ऋषी जयस्वाल हा त्याचे मित्र जयप्रकाश प्रजापती, संदेश खंडागळे, रोहित कनेरेकर आणि इतर स्टाफसह मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये कामावर होते. त्यावेळी त्याच हॉटेलमध्ये डिलिव्हरी रायडरचे काम करणारा प्रकाश शिवलकर (५५).याने दोन दिवसांपूर्वी गिऱ्हाईकांची डिलिव्हरी बुकिंगची ऑर्डर ही तुझ्या नावावरती का फिरवली ? असा प्रश्न विचारत ऋषी जयस्वाल याच्याशी वाद घातला.

यावेळी प्रकाश शिवलकर दारूच्या नशेत होता. वाद वाढल्यानंतर त्याने शिवीगाळ करत त्याच्या उजव्या हातात असलेल्या चाकूने ऋषीच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे ऋषी गंभीर जखमी होऊन कोसळला. हे पाहून हल्लेखोर प्रकाश शिवलकर याने तेथून पळ काढला. हॉटेलमधील इतर स्टाफ मित्रांनी तात्काळ ऋषीला जवळच्या शिवम हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले.

वेळीच उपचार मिळाल्याने ऋषी जयस्वाल बचावला आहे. शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना घडलेल्या घटने संदर्भात माहिती दिली. त्याच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर अद्याप हाती लागला नसून पोलिस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT