

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील बहुचर्चित शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणाने पुन्हा एकदा न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी कल्याण सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली असून न्यायालयीन कोठडीत अर्थात सद्या तुरुंगात असलेल्या महिला आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन देऊ नये, असा जोरदार युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला.
सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले की, हे केवळ मारहाणीचे प्रकरण नाही तर वैद्यकीय व्यवस्थेवरचा हल्ला आहे. रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला बेदम मारहाण करून जीवाला धोका निर्माण करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल १८३२ पानांचे भक्कम पुरावे असलेले दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सोमवारी ६ जुलैच्या रात्री आठव्या सुमारास एका गर्भवती महिलेच्या उपचारावरून झालेल्या वादातून शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. रूग्णालयात घडलेल्या हिंसाचाराला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली आरोपींना चिथावणी देणाऱ्या साधना कारंडे या महिला आरोपीला जामीन मिळाला तर ती साक्षीदार असलेल्या रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांवर दबाव आणू शकते, पुराव्यांशी छेडछाड करू शकते, त्यामुळे तिला जामीन देणे धोक्याचे ठरेल.
यावर बचाव पक्षाने पलटवार करत सांगितले की, महिलेचा प्रत्यक्ष मारहाणीत सहभाग नाही, केवळ गर्दीत होती म्हणून तिला गोवण्यात आले आहे. ती अनेक दिवसांपासून कारागृहात आहे, तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे आता तिला कोठडीत ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. एका गर्भवती रुग्णाच्या उपचारावरून झालेल्या वादातून रमेश म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत रुग्णालयातच मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर डॉक्टर संघटना आक्रमक झाल्या होत्या, डोंबिवली आणि कल्याणमधील खाजगी डॉक्टरांनी काही काळ ओपीडी बंद ठेवून निषेध नोंदवला होता. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रमेश म्हात्रे यांच्यासह पाच जणांना अटक केली होती. त्यापैकी रमेश म्हात्रे सह चार पुरुष आरोपींना यापूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, मात्र साधना कारंडे या आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने ती अजूनही न्यायालयीन अर्थात आधारवाडी कारागृहात आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करत १ हजार ८३२ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असून वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब हे महत्त्वाचे पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत. न्यायालयाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीन महिन्याच्या आत निकाल लावण्याच्या दृष्टीने फास्ट ट्रॅक पद्धतीने सुनावणी सुरू ठेवली आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी ठेवली असून त्या दिवशी महिला आरोपीला जामीन मिळणार की तिचा मुक्काम कारागृहातच वाढणार हे स्पष्ट होणार आहे, त्यामुळे 19 तारखेच्या सुनावणीकडे संपूर्ण डोंबिवलीकरांचे आणि वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.