Ram Purnekar File Photo
ठाणे

Ram Purnekar Diwali Pahat Event: दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या परवानगीवरून राम पूर्णेकरांचा पोलिसांना सवाल

वडिलांच्या मृत्यू प्रकरणातील तपास सुरू असताना कार्यक्रमाला परवानगी कशी? कलाकार आशिष म्हात्रे आणि अनिमेष ठाकूर यांची उपस्थित राहण्यास नकार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: वडिलांच्या हत्या प्रकरणात न्यायासाठी संघर्ष करणारे राम पूर्णेकर यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजनावरून पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माजी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘दिवाळी पहाट युवा जल्लोष’ कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिल्याचे समोर आल्यानंतर राम पूर्णेकर यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत पोलीस प्रशासनाला जाब विचारला आहे.

‘वडिलांच्या हत्येला ३६ दिवस उलटले असताना, हत्या प्रकरणातील आरोपी किंवा कथित मास्टरमाइंडला कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी कशी दिली जाते?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने मासुंदा तलाव परिसरातील रंगो बापूजी गुप्ते चौक येथे दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यंदा या कार्यक्रमाची जबाबदारी शिवसेना महिला आघाडीने स्वीकारली आहे. मात्र, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाची अद्याप चर्चा सुरू असतानाच या कार्यक्रमाला परवानगी मिळाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला

३६ दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आगरी-कोळी समाजा- सह विविध समाजांतील नागरिकांनी दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच न्यायाच्या मागणीसाठी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘एक दिवा न्यायाचा, एक दिवा दादांच्या नावाचा’ हा उपक्रम राबविण्याचे आवाहन समाज बांधवांकडून करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राम पूर्णेकर यांनी आपल्या पोस्टमधून पोलिसांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी महिला आघाडीचे नाव नमूद करण्यात आले आहे. मग प्रत्यक्षात या आयोजनामागे नेमके कोण आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.

न्यायासाठी आपण लढा देत असताना दुसरीकडे संबंधितांना कार्यक्रमासाठी परवानगी मिळत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

न्याय मिळावा ही अपेक्षा...

‘मला कोणत्याही राजकारणाशी देणे-घेणे नाही. माझ्या वडिलांना न्याय मिळावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. दरम्यान, हत्या प्रकरणाच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या परवानगीचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

कार्यक्रमाला कलाकारांचीही पाठ...

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला गायक आणि आगरी कोळी समाजाच्या कलाकारांनी देखील पाठ फिरवली आहे. गायक आशिष म्हात्रे आणि संगीतकार व गायक अनिमेष ठाकूर यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेची ठाण्यात चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT