Thane District Voter Registration pudhari photo
ठाणे

Thane District Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदविण्याची शेवटची संधी!

एसआयआरसाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे; ठाणे जिल्ह्यात २ लाख २२ हजार मतदार मृत, ७.३५ लाख कायमचे स्थलांतरित

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १९ लाख स्थलांतरित, अर्ज भरण्यास नकार देणाऱ्या आणि दुबार मतदारांकरिता गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. मृत मतदारांची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. या गणना प्रपत्राचे वितरण व संकलन ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात येत असून, सदर प्रपत्रे १० डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे २८ व २९ नोव्हेंबरला विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार एसआयआर मोहिमेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार श्रेणीतील पात्र मतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याकरिता गणना प्रपत्र दाखल करणे सुलभ व्हावे, यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमधील प्रत्येक मतदान केंद्रावर शनिवार २८ नोव्हेंबर आणि रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

कारण ठाणे जिल्ह्यात तब्बल २८ लाख मतदारांनी प्रगणना अर्ज भरलेच नाही. त्यामध्ये २ लाख २२ हजार ७०६ मतदार मृत तर ७ लाख ३५ हजार १४४ कायमचे स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर ठाणे जिल्ह्यातील तब्बल १९ लाख २ हजार ४१६ पात्र मतदारांनी 'एन्यूमरेशन फॉर्म'च (प्रगणना अर्ज ) बीएलओकडे जमाच केले नाहीत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रगणना अर्ज दाखल करू न शकणाऱ्या पात्र मतदारांना शेवटची संधी उपलब्ध केलेली आहे. या विशेष शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासमवेत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याच्या सूचना संबंधित राजकीय पक्षांमार्फत देण्यात आल्या आहेत.

तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित पात्र मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आपली नावे मतदार यादीत अद्ययावत व नोंदणीकृत करून घ्यावीत, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT