दिलीप शिंदे
ठाणे: सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ९०० खाटांचे अत्याधुनिक ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे.
गंभीर रुग्णांच्या तात्काळ उपचारांसाठी आणि एअर ऍम्ब्युलन्स सेवेसाठी या सरकारी रुग्णालयात पहिले रूफटॉप हेलिपॅड उभारण्यात आले आहे. रुग्णालयातील कामे पूर्ण होण्यासाठी आणखी सहा-सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
या एकात्मिक आरोग्य संकुलात एकाच छताखाली ५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय, २०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय आणि २०० खाटांचे रेफरल व अति-विशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) रुग्णालय असेल. येथे हृदयरोगशास्त्र (कार्डिओलॉजी- ७० खाटा), मज्जासंस्थारोगशास्त्र (न्यूरोलॉजी ५० खाटा), मूत्रपिंडविकारशास्त्र (नेफ्रोलॉजी- ० खाटा) आणि कर्करोगशास्त्र (ऑन्कोलॉजी- ५० खाटा) या क्षेत्रांत प्रगत उपचार उपलब्ध असतील, तसेच १६ अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहे असतील.
एवढेच नव्हे तर, आपत्कालीन व गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या टेरेसवर विशेष 'हेलीपॅड'ची रचना करण्यात आली असून, तेथे एअर अॅम्बुलन्स सहज उतरणार आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयाच्या दोन सात मजली इमारती असून एका इमारतीत अद्ययावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज जिल्हा रुग्णालय, तर दुसर्या इमारतीत संदर्भ सेवा रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील विविध तपासणी विभाग कार्यरत असतील.
तिसर्या इमारतीत विविध प्रशासकीय विभाग, परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह यांसह विविध रुग्णालयीन विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची दालने व निवासस्थाने आहेत.
तसेच, सुसज्ज नेत्ररोग विभाग तयार करण्यात येणार असून यात अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रक्रिया गृह, लेसर उपचार पद्धती, रेटिना उपचार पद्धती आदी आधुनिक उपचारांचा समावेश आहे. अत्याधुनिक रक्तपेढी, अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, ऑटोक्लेव्ह रूम, डायलिसिस विभाग, रुग्णांच्या नातलगांसाठी निवासाची सोय, सर्व इमारतींसाठी सौर व्यवस्था, सेंट्रल ऑक्सिजन व सेक्शन सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, १०० क्षमतेचे शवागृह आदी सुविधा या नव्या रुग्णालयात असणार आहेत.
रुग्णांना ठाण्यातच उपचार मिळणार
मुख्य रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून अनेक महिन्यांपासून रखडलेली वीज जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. या वीज पुरवठा मंजूर होण्यासाठी मंत्रालयाच्या स्तरावर प्रयत्न करावे लागले. नवी मुंबई येथून एक्सप्रेस फीडर मंजूर झाला.
१ हजार ७८ नवीन पदे मंजूर झाली आहेत. हे जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरविणारे सरकारी रुग्णालय कार्यान्वित झाले की ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील हजारो सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी अन्यत्र कुठेही धाव घ्यावी लागणार नाही. रुग्णांना ठाण्यातच अत्याधुनिक व सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार विनामूल्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.