ठाणे: ठाणे जिल्ह्यात मागच्या वर्षीचा सरासरी एवढा पाऊस झाला असून, कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये पावसाने मागच्या वर्षीची सरासरी गाठली आहे. ठाण्यामध्ये जांभुळपाडा, बदलापूर, टिटवाळा येथे पाचव्या दिवशीही पूरस्थिती होती.
आतापर्यंत सरासरी २६९९ मिमी पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाने आपल्या अहवालात म्हटले आहे. धरणांमध्येही समाधानकारक पाणी वाढ झाली आहे. तर आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
वागळे परिसरात एका व्यक्तीच्या अंगावर झाड कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. तर नेरुळ येथे २ मुली शॉक लागून जखमी झाल्या. कळवा येथे झाड पडल्याने विजय पाली व राजकुमा यादव हे गंभीर जखमी झाले. तर किसान नगर येथे इमारतीचा भाग कोसळल्याने सुरेश पांचाळ, नुरी इस्लाम शेख आणि सुरेश थापा जखमी झाले, तर वाशी येथे स्लॅब कोसळून २ महिला जखमी झाल्या.
मीरा-भाईंदर येथे झाड कोसळून अशोक पाटील (वय-३५) यांच्या मृत्यू झाला. अंबरनाथ चिखलोली येथे विश्वनाथ कांबळे भिवंडीतील गावगाव परिसरात नदीत बुडालेल्या मेहमूद गौस नफीस अन्सारी (वय-१७) यांच्यावर उपचार सुरू असून, नारपोली येथील अब्बू तालिब अन्सारी (वय - १३) यांनाही पावसामुळे वाढलेल्या पाण्याच्या संपर्कात आल्याने शॉक बसल्याने उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अकराशे लोकांचे स्थलांतर झाले आहे. दरडप्रवण क्षेत्र, घरात पाणी शिरणे, नदीच्या पुराचे पाणी घरात येणे, अश्या विविध कारणांनी हे स्थलांतर झाले आहे. त्यांना सुरक्षित स्थळी पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली आहे. कुंभारमली, शंकराचार्य मठ, प्राथमिक शाळा येथे त्यांची व्यवस्था केली आहे.
एकूण १३२ घरांचे चार दिवसाच्या पुरात नुकसान झाले तर २५ टक्के घरांचे नुकसान झाले आहे. तसेच महापालिका क्षेत्रात जवळपास ७ ठिकाणी विविध कारणांनी राशिवाश्यांचे स्थलांतर केले आहे. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था पाचव्या दिवशीही कोलमडलेली होती.
घोडबंदर येथे अपघातात २ ठार; कंटेनर रिक्षावर पलटी; चालकासह दोघांचा मृत्यू
कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी-मार्ट शेजारी, अर्बन लॅडर शोरूमसमोरील मीरा-भाईंदरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रिक्षा (एमएच ०४ एक्सएक्स ८६४०) आणि टेलर (एमएच ४६ बीएफ ७६४८) यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात टेलरवरील कंटेनर रिक्षावर पलटी झाल्याने रिक्षाचालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला.
या अपघातात रिक्षाचालक दशरथ राणाजी पवार (रा. जय भीम नगर, मुंबई-पुणे रोड, कळवा, ठाणे) आणि प्रवासी मोहम्मद अमीन (मूळ रा. स्वानगर, मोहम्मद फशी मशीदजवळ, सरालगंज, बहराईच, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला. जखमी अमजीत नूर अली अन्सारी (मूळ रा. झारखंड, सध्या रा. जामा मशिद बेकरीजवळ, कासारवडवली, ठाणे) याच्यावर वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर टेलरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यावर सांडलेले साहित्य व इतर अडथळे हटवून पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.