शुभम साळुंके
नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपासून रासायनिक खतांची बुकिंग घरबसल्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकरी स्वतःच्या अथवा कुटुंबातील सदस्याच्या मोबाईलवरून ‘FFS’ अॅपच्या माध्यमातून आपल्या गरजेनुसार पीकनिहाय रासायनिक खतांची आगाऊ बुकिंग करू शकणार आहेत. त्यामुळे खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर होणारी गर्दी आणि धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून झाडाच्या एका पानाचे चिन्ह असलेले ‘FFS’ अॅप डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर आधार ओटीपी अथवा ई - केवायसीच्या माध्यमातून ओळख पडताळणी करून आपला फार्मर आयडी अथवा अॅग्रिस्टॅकचा ११ अंकी क्रमांक नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर जवळचे कृषी सेवा केंद्र निवडून एका हंगामासाठी आवश्यक असलेल्या पीकनिहाय रासायनिक खतांची बुकिंग करता येणार आहे.
विशेष म्हणजे, ज्या कृषी सेवा केंद्राची निवड करून खताची बुकिंग करण्यात आली आहे, त्या केंद्रातून बुकिंगनंतर तीन दिवसांच्या आत खताची उचल करणे बंधनकारक राहणार आहे. बुकिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना क्यूआर कोड अथवा टोकन क्रमांक मिळणार असून, त्याच्या आधारे कृषी सेवा केंद्रातून खताचा पुरवठा केला जाणार आहे.
या उपक्रमाबाबत ठाणे जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच कृषी सेवा केंद्र चालकांसाठी नुकतीच पंचायत समिती हॉल, कल्याण येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे. जिल्हा मोहीम अधिकारी बनकर, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी शिंदे तसेच सर्व तालुकास्तरीय गुणनियंत्रण अधिकारी उपस्थित होते.
त्यांनी अॅपवरील बुकिंग प्रक्रिया, खत उपलब्धता आणि शेतकऱ्यांना द्यावयाच्या सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण आशिष बालगुडे यांचीही उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेत पीकनिहाय आवश्यक खतांची वेळेत बुकिंग करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.