Thane News : घनदाट जंगलात अडकलेल्या महिलेची तीन दिवसांनी सुटका

पोलिस मित्रांसह तरुणांचे शर्थीचे प्रयत्न, आदिवासी-स्थानिक तरुणांचे बचाव ऑपरेशन झाले यशस्वी
Thane News : घनदाट जंगलात अडकलेल्या महिलेची तीन दिवसांनी सुटका
Published on
Updated on

नेवाळी : किल्ले श्री मलंगगड परिसरातील घनदाट जंगलात तीन दिवसांपासून अडकलेल्या सफिया (वय ५५) या महिलेची बुधवारी हिललाईन पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आदिवासी तरुण व पोलिस मित्रांनी सुखरूप सुटका केली आहे. बचावानंतर महिलेला पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सफिया या छत्रपती संभाजीनगर येथून रविवारी श्री मलंगगडावर देवदर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर परिसरातील पायवाटेचा अंदाज न आल्याने त्या घसरून कड्यालगच्या घनदाट जंगलात अडकल्या. दुर्गम आणि धोकादायक परिसर असल्याने त्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान बचाव पथकासमोर होते. महिला जंगलात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आदिवासी तरुण आणि पोलिस मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला होता. परिसरातील अवघड वाटा, दाट झाडी आणि कड्यांचा भाग यामुळे शोधमोहीम काळजीपूर्वक राबवण्यात आली. अखेर बुधवारी दुपारी बचाव पथकाला सफिया यांचा ठावठिकाणा मिळाला. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे जंगलाबाहेर आणण्यात आले.

बचावानंतर महिलेची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना तातडीने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या बचावकार्यात स्थानिक आदिवासी तरुणांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची ठरली. पोलिस मित्र विष्णु पुजारी यांनीही बचावकार्यात मोलाचे योगदान दिल्याने महिलेचा जीव वाचवण्यात यश आले. स्थानिकांच्या या तत्परतेमुळे तीन दिवसांपासून जंगलात अडकलेल्या महिलेची सुखरूप सुटका झाली आहे.

“किल्ले श्री मलंगगड येथे निसर्गपर्यटन तसेच देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, काही पर्यटक उंच कडे, खोल दरी व इतर धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतात. स्थानिक नागरिक तसेच पोलिस प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा निष्काळजीपणामुळे पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि दुर्दैवी घटना घडतात. पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.”

— ओमकार पावशे, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news