दिलीप शिंदे
ठाणे: दहा वर्ष संचालकपद भूषविले म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह 15 संचालकांना बँकेची निवडणूक लढविता येणार नाही. आगामी महिनाभरात होणाऱ्या बँकेच्या निवडणुकीत 75 टक्क्यांपेक्षा अधिक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
दरम्यानस, मुदत संपत आलेल्या आणि निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या ठाणे, नांदेड, अहिल्यानगर, अकोला वाशिमसह सुमारे 13 बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्याची चर्चा बँकिंग क्षेत्रात सुरु आहे.
या बँकांचा कारभार प्रशासकांच्या हाती दिला जाणार आहे. त्यानुषंगाने सरकारने हालचाली सुरु केल्या असून सोमवारपर्यंत प्रशासक नियुक्त होऊ शकतो, अशीही चर्चा बँकिंग क्षेत्रात सुरु आहे. बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम 2025 ची अंमलबजावणी ही जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने घराणेशाहीला आणि प्रस्थापित बड्या नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. हा नियम राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू झाला आहे.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची 4 हजार 27 मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हे मतदार 21 संचालक निवडून देणार आहेत. त्यामध्ये 4 हजार 27 मतदार आहेत. आक्षेप घेण्यासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून 14 मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी मिलिंद भालेराव यांनी जाहीर केले आहे.
या निर्णयाचा फटका ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, आमदार राजेश पाटील, बाबाजी पाटील, शिवाजीराव शिंदे, भाऊ कुऱ्हाडे, दिलीप पाटेकर, निलेश भोईर, अनिल मुंबईकर, राजेश पाटील, रेखा पाष्टे, जगनाथ चौधरी, प्रशांत पाटील, इंद्रजित पडवळ, सुभाष पवार या विद्यमान संचालकांना बसणार आहे.
संचालक बाबुराव दिघा यांचे निधन झाले आहे. विद्यमान उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी आमदार अमित घोडा, नागेश पाटील, निवृत्ती घुसेकर, दासू रेडया, नीता कांबळी हे संचालकपदाची पुन्हा निवडणूक लढवू शकतात.
आगामी निवडणुकीत बँकेचा अध्यक्ष भाजपचा?
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2021 निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला 9 भाजपा 7 व अन्य 2 असे सहकार पॅनलचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले होते. आगामी निवडणुकीत बँकेचा अध्यक्ष हा भाजपच्या विचाराचा बनविण्याची रणनीती आखली असून त्यानुसार भाजपने पाऊले टाकली असल्याची चर्चा रंगली आहे.