Thane Development Model File Photo
ठाणे

Thane Development Model: विकासाच्या वेगाने ‌‘ठाणे पॅटर्न‌’ देशासाठी आदर्श; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

आमचा अजेंडा हा फक्त विकासाचा आहे; मला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळाले पाहिजे हेच आमचे ध्येय आहे, असे स्पष्ट करत त्यांनी ‌‘ठाणे पॅटर्न‌’ देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: पूर्वी ‌‘पुणे तिथे काय उणे‌’ म्हटले जायचे; आता ‌‘ठाणे तिथे काय उणे‌’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहे, असे ठामपणे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासाचा व्यापक आराखडा मांडला. आमचा अजेंडा हा फक्त विकासाचा आहे; मला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळाले पाहिजे हेच आमचे ध्येय आहे, असे स्पष्ट करत त्यांनी ‌‘ठाणे पॅटर्न‌’ देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिटतर्फे आयोजित 23 व्या रियल इस्टेट आणि हाउसिंग फायनान्स एक्स्पोमध्ये ते बोलत होते. यावेळी उपस्थित विकासक, बँक अधिकारी आणि मान्यवरांना शुभेच्छा देताना त्यांनी “चलो ठाणे” हे गाणे सर्वत्र व्हायरल करण्याचे आवाहन केले.

सकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसले तरी आपण दरवर्षी या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये सहभागी होत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. बाळासाहेब ठाकरे यांनी 40 लाख घरांचे स्वप्न दाखवले होते, ते पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे, वडाळा, घाटकोपर, गायमुख, मीरा-भाईंदर असा मेट्रो लूप तयार होत असून, ठाणे-भिवंडी-कल्याण-अंबरनाथ-तळोजा मार्गे दुसरा लूप नवी मुंबईशी जोडला जाणार आहे. 337 किमी मेट्रो नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ठाण्यात अंतर्गत मेट्रो सुरू होत असून ती मुख्य मेट्रोला जोडली जाणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येत असून मुंबई आणि ठाण्यातही तो उभारला जाणार आहे. ही पॉड टॅक्सी मॉल्सपर्यंतही जाणार असल्याने नागरिकांना अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत. रस्ते, मेट्रो आणि पॉड टॅक्सीमुळे वाहतूक सुरळीत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घोडबंदर रोडवर एलिव्हेटेड रोड, कोस्टल रोड आणि एमएमआरडीएचे तीन मोठे ब्रिज उभारले जात आहेत. गायमुख परिसरातून ग्रामीण भाग जोडून ‌‘नवीन ठाणे‌’ विकसित केले जाणार आहे. यामुळे ठाण्यातील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या प्रसंगी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, एमसीएचआय ठाणे शाखेचे अध्यक्ष सचिन मीराणी, संजय बोरकर, नगरसेवक संजय भोईर, जय बोरा तसेच विविध विकासक, प्रमुख बँकांचे कर्ज विभागातील अधिकारी आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विशेष तरतुदी

नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असून परवडणारी घरे बांधणे विकासकांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिअल इस्टेट क्षेत्र कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे असून 250 उद्योग या क्षेत्रावर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT